मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. संकेत हा मनोरंजन विश्वात सक्रीय आहेच शिवाय तो एक युट्यूबरही आहे. संकेत आणि त्याची बहीण उमा कोर्लेकर यांचे अनेक रील आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघा बहीण-भावाच्या जोडीचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं. अशातच दोघांच्याही युट्यूब चॅनलला सिल्व्हर बटण मिळालंय. त्यामुळे सोशल मीडियावर बहीण-भावाच्या जोडीचं कौतुक होतंय.
संकेतची खास पोस्ट चर्चेत
या आनंदाच्या प्रसंगी संकेतने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून सांगितलं की, "घरात लहानपणापासून आई पप्पांनी आम्हा दोघांना मोठं करण्यासाठी केलेला संघर्ष बघत मोठे झालोय. पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि आईची कमी पगारात केलेली काटकसर स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे. आई वडिलांनी आमच्यासाठी स्वतःच पोट किती मारलय हे आमचे आम्हाला दोघांनाच माहीत. आम्हाला दोघांना आई वडिलांनी आमच्यावर केलेल्या संस्काराची जाणीव आहे त्याची किंमत आहे त्यामुळे आजपर्यंत आई पप्पांची मान फक्त गर्वाने वर झाली कधीच झुकली नाही."
"आज त्यांचा मुला मुलीने एकाच घरात दोन सिल्व्हर प्ले बटण आणले आहेत. आमची स्पर्धा स्वतःशी आहे त्यामुळे हरायची भीती नाही. कोण किती पुढे जातंय कोण किती मागे राहतय ह्याचाशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. आमचे टार्गेट ठरले आहे.. आम्हाला इतकं मोठं व्हायचय की आई पप्पानी आमचा इतका पैसा बघून टेन्शन घेणेच सोडले पाहिजे. आम्ही क्लिअर आहोत.. स्वतःचा रस्ता , स्वतःचे विश्व आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद.. बस... बाकी सगळं आमची मेहनत बघून घेईल.. धन्यवाद." कलाकार आणि संकेतचे चाहते सोशल मीडियावर त्याचं अभिनंदन करत आहेत."