Join us

लोकप्रिय हिंदी मालिकेत संजय नार्वेकर यांची एन्ट्री, खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:16 IST

अनेक हिंदी मालिकांमध्ये संजय नार्वेकर यांनी काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

संजय नार्वेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अगं बाई अरेच्चा, खबरदार, ये रे येरे पैसा, टाइमपास, सरीवर सरी, चष्मेबहाद्दर, नऊ महिने नऊ दिवस यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे. वास्तव या संजय दत्तच्या सिनेमात ते झळकले होते. अनेक हिंदी मालिकांमध्ये संजय नार्वेकर यांनी काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

 ‘ज्युबिली टॉकीज- शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ या हिंदी मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत ते खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेत ते अतिशय धूर्त आणि निर्दयी असलेला कॉन्ट्रॅक्टर मुकेश जाधव ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘ज्युबिली टॉकीज' मालिकेचं कथानक सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत शिवांगीचा अपमान करत AG तिला त्याची गर्लफ्रेंड ईरा परत येईपर्यंत त्याच्या मार्गात येऊ नये असं सांगतो.तर दुसरीकडे मात्र शिवांगी तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ आहे. 

मुकेश जाधवला ‘संगम सिनेमा’ हे चित्रपटगृह काही करून बळकावायचे आहे. त्यासाठी तो शिवांगी आणि तिच्या आईच्या शोधात आहे. जाधव दाढी करवून घेत असताना त्याचा एक अंगरक्षक धावतपळत येतो आणि खबर देतो की त्यांना शिवांगीचा ठावठिकाणा लागला आहे. दचकलेल्या न्हाव्याच्या हातून जाधवला जराशी दुखापत होते. सोशल मीडियावर AG आणि शिवांगीचे छायाचित्र पाहून जाधव आपला मनसुबा व्यक्त करतो, “आता हजामत मी करणार”. आणि असे बोलताना  न्हाव्याचा गळा कापतो.

या दृश्याबद्दल बोलताना कॉन्ट्रॅक्टर मुकेश जाधवची भूमिका करत असलेले संजय नार्वेकर म्हणतात, “एखादे धूर्त पात्र साकारण्यात जो एक आवेग असतो, तो मला आवडतो. आणि मी साकारत असलेल्या मुकेश जाधवमध्ये अनेक ग्रे छटा आहेत. त्याच्यासाठी अशक्य असे कोणतेच काम नाही. आणि कोणतीही किंमत देणे त्याला सहज शक्य आहे. त्यामुळेच तो एक निर्ढावलेला खलनायक आहे. आगामी भागांमध्ये त्याला शिवांगीचा ठावठिकाणा कळेल आणि तिच्याकडून संगम सिनेमाची कागदपत्रे मिळवण्यासाठी तो वाट्टेल ते करेल". कॉन्ट्रॅक्टर जाधवमुळे मालिकेच्या कथानकात नक्कीच भय आणि नाट्याचा एक नवीन थर जोडला जाणार आहे.  याचा शिवांगी, तिची आई आणि सर्व संबंधितांच्या आयुष्यावर प्रभाव पडत असल्याचं पाहायला मिळणार आहे.  सोनी टीव्हीवर ही मालिका सोम-शुक्र रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

टॅग्स :संजय नार्वेकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता