Join us
Daily Top 2Weekly Top 5

"२ वेळा बैलगाडी अंगावरून गेली, टमटमने धडक दिली तरीही...", संदीप पाठकने शेअर केला ८५ वर्षीय आजोबांचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:36 IST

संदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ८५ वर्षांच्या आजोबांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधून त्याने या आजोबांचं कौतुक केलं आहे.

संदीप पाठक हा मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना तो दिसला. प्रत्येक भूमिकेतून त्याने त्याची वेगळी छाप पाडली. संदीप पाठक सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टच्या अपडेटबरोबरच तो अनेक व्हिडिओही शेअर करताना दिसतो. 

नुकतंच संदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ८५ वर्षांच्या आजोबांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधून त्याने या आजोबांचं कौतुक केलं आहे. संदीपने शेअर केलेल्या व्हिडिओत एक आजोबा काठी टेकत चालताना दिसत आहेत. आजोबांची विचारपूस करताना संदीप दिसत आहे. "मी धाराशिवला वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाच्या प्रयोगासाठी चाललो आहे. तुम्हाला बघून थांबलो. तुम्ही एवढे वाकून चालत होतात. काही झालंय का?", असं आजोबांना संदीप विचारताना दिसत आहे. तेव्हा आजोबा त्याला दोन वेळा अंगावरुन बैलगाडी गेली आणि टमटमने धडक दिल्याचं सांगत आहेत. 

हा व्हिडिओ शेअर करत संदीप म्हणतो, "प्रवासात ८५ वर्षांचे आजोबा भेटले. दोन वेळा अंगावरून बैलगाडी गेली त्यानंतर टमटम ने धडक दिली, तरी जगण्याची उमेद आणि इच्छाशक्ती कायम. ह्या वयात आजोबांचं शेतीकडे दुर्लक्ष झालेलं नाही. मला अशी माणसं प्रेरणा देतात आणि जगण्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवतात. आजोबा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो".

संदीप अनेकदा असे व्हिडिओ शेअर करत असतो. अनेकदा तो वृद्धांना मदतही करताना दिसतो. दरम्यान, सध्या तो कलर्स वाहिनीवरील 'इंद्रायणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो अंताजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता