Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक मामांनी प्रशांत दामलेंना दिलेलं टोपणनाव माहितीये का? आजही याच नावाने मारतात हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:14 IST

Prashant damle: या दोन्ही कलाकारांमध्ये घनिष्ठ मैत्री असून अशोक सराफ, प्रशांत दामले यांना प्रेमाने एका खास नावाने हाक मारतात.

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेते म्हणजे प्रशांत दामले (prashant damle) आणि अशोक सराफ (ashok saraf). या दोन्ही कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे आज कलाविश्वात या दोन्ही कलाकारांकडे आदराने पाहिलं जातं. विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांमध्ये घनिष्ठ मैत्री असून अशोक सराफ, प्रशांत दामले यांना प्रेमाने एका खास नावाने हाक मारतात. प्रशांत दामले यांनी अलिकडेच या नावाचा खुलासा केला आहे.

प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांनी ‘आयत्या घरात घरोबा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘प्रेमांकुर’, ‘आनंदी आनंद’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. अलिकडेच प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर त्यांचं टोपणनाव सांगितलं. तसंच हे नाव अशोक सराफ यांनी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेले प्रशांत दामले त्यांच्या नाटकांविषयी अनेक पोस्ट शेअर करत असतात. यात त्यांच्या नाटकांच्या प्रयोगाविषयी, रंगमंचावर घडणाऱ्या किस्स्यांविषयी ते भाष्य करतात. विशेष म्हणजे चाहतेदेखील कमेंट करुन त्यांच्याशी संवाद साधतात.

प्रशांत दामले यांनी जानेवारी महिन्यात ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या नाटकाच्या टीमबरोबर एक फोटो पोस्ट करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. यामध्येच एका चाहत्याने  “सेम टू यू. दांबले सर, पुन्हा हा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे कधी होईल? वाट पाहतोय,” अशी कमेंट केली. यावर प्रशांत दामले यांनी उत्तर देत अशोक मामांनी मला हेच टोपणनाव दिलंय असं म्हटलं. 

अशोक मामांनी प्रशांत दामलेंना दिलं हे नाव

“दांबले हे आवडलं. अशोकमामा मला प्रेमाने अशी हाक मारतो,” असं उत्तर देत प्रशांत दामले यांनी त्यांच्या टोपणनावाविषयी सांगितलं.  

टॅग्स :प्रशांत दामलेअशोक सराफसिनेमासेलिब्रिटी