Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीच्या आजोबांची होणार 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत एंट्री, साकारणार तात्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 18:41 IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेनं दीड वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता या मालिकेतील यश आणि परीच्या आजोबांची 'जिवाची होतीया काहिली' मालिकेत एंट्री झाली आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath )  मालिका आली आणि तुफान लोकप्रिय झाली. यश व नेहा अर्थात प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) मालिकेतील रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता या मालिकेतील दिग्गज अभिनेते प्रदीप वेलणकर यांची एंट्री होणार आहे. 

सोनी मराठी वाहिनीवरील  'जिवाची होतीया काहिली' ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आहे.

 सध्या गावात मराठी शाळा बंद करण्यावर अप्पा भर देत आहेत. त्याविरुद्ध अर्जुनचा लढा सुरू आहेच, पण तात्यांचे गावात पुनरागमन झाले आहे. ते आता अर्जुनला कशा प्रकारे मदत करतील, हे पाहायला मिळेल. पण मालिकेत आता तात्यांचा भूमिकेत प्रदीप वेलणकर पाहायला मिळणार आहेत. निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारे दिग्गज अभिनेते प्रदीप वेलणकर आता तात्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तात्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि मराठी भाषेवरील प्रभाव प्रदीप वेलणकर कशा प्रकारे निभावतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्जुन आणि रेवथी यांचे प्रेम यापुढे कसे फुलत जाणार आहे, हे पाहायला मिळेल.

टॅग्स :टिव्ही कलाकारसोनी मराठी