कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो.
कुशलने नुकतीच इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "कधी कधी काही माणसं अर्ध्यातच सुटतात आपल्याकडून...म्हणजे नेमकं असं closure मिळत नाही त्यांच्या सोबतच्या नात्याला...पण दुरावा येतो आणि मग कधीतरी...पुन्हा फिरून ती माणसं आपल्या आयुष्यात आली की वाटतं, जिथे थांबलो होतो तिथूनच सुरवात होईल कदाचित आपल्या नात्याची. पण तसं होत नाही. ती एक नवीन सुरवात असते..ते नातं पुन्हा बहरेलच, असं सांगता येत नाही" असं कुशलने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
कुशलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोने कुशलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो दिसला होता. या शोमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'जत्रा', 'पांडू', 'डावपेच', 'भिरकीट', 'रंपाट', 'बापमाणूस', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'माझा नवरा तुझी बायको' यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे.