आज सर्वजण नवीन वर्षाचं खास पद्धतीने स्वागत करत आहेत. सरत्या वर्षाला अर्थात २०२४ ला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात निश्चितच एक हळवेपणा असेल. अशातच २०२५ चं स्वागत करताना सर्वजण उत्साहात असतील. मराठी मनोरंजन विश्वातील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत २०२५ चं स्वागत केलंय. अशातच अभिनेता कुशल बद्रिकेने २०२४ ला निरोप देताना आणि २०२५ चं स्वागत करताना केलेली पोस्ट चर्चेत आली.
कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
कुशल बद्रिकेने खास फोटो शेअर करुन लिहिलंय की, "कुणीतरी “खो” दिल्या सारखं “2024” उठून गेलं आणि “2025” कधी शेजारी येऊन बसलं, काही कळलंच नाही. जीवन मृत्यूच्या दोन खांबांमध्ये व्यायाम, डायेट, करिअर, कुटुंब ह्यांचा आपापसांत “खो-खो” चाललाय. आनंद भलता चपळ निघालाय दुःखाच्या हाती लागता-लागत नाहीये. आणि डाव संपता-संपत नाहीये.ह्या वर्षी खेळ आणखी रंगेल असं वाटतय ! Happy new year:- सुकून."
कुशल बद्रिकेचं वर्कफ्रंट
कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तर गेली अनेक वर्ष कुशलने 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशलने साकारलेल्या विविधरंगी, विविधढंगी भूमिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. कुशलची संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण यांच्यासोबत असलेली 'स्ट्रगलर साला' ही वेबसीरिजही चर्चेत आहे. कुशल बद्रिके सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीये. तो सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात असतो.