Join us

 ‘या’ मराठी अभिनेत्यानं तेजस्वी यादवांना दिल्या शुभेच्छा; म्हणाला, ‘ते धाडसी... ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 17:29 IST

Tejashwi Yadav : सध्या तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. तिकडे बिहारातही अशीच उलथापालथ अनुभवायला मिळाली. नऊ वर्षांत भाजपशी दुसऱ्यांदा काडीमोड घेतलेल्या नितीश कुमारांनी पुन्हा आपला पक्षाचा भाजपला असलेला पाठींबा काढून घेतला. यानंतर राजद व अन्य काही अपक्षांना सोबत घेऊन त्यांनी नवं सरकार स्थापन केलं.  नितीश कुमार मुख्यमंत्री झालेत आणि राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav )उपमुख्यमंत्री झालेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे चिरंजीव असलेले तेजस्वी यादव यांना कधीकाळी कमी शिक्षणामुळे हिणवलं जात होतं. मात्र त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं. अगदी ‘ऑपरेशन तेजस्वी’ यशस्वी करून दाखवलं.

सध्या तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या मराठी अभिनेत्याचं नाव काय तर हेमंत ढोमे (Hemant Dhome ).

होय, हेमंत ढोमे याने  ट्विट करत तेजस्वी यादव यांना  शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राष्ट्रीय जनता दलाचे तरुण आणि धाडसी नेत्तृत्व असणारे तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! तुमची पुढील कारकीर्द यशस्वी होवो. बिहारच्या आणि पयार्याने आपल्या देशाच्या विकासात आपण मोलाचं योगदान द्याल अशी अपेक्षा आणि मन:पुर्वक शुभेच्छा...’, असं  ट्विट हेमंतने केलं आहे. त्याचं हे  ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतंय.

त्याच्या या  ट्विटवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. खूप धाडसी  ट्विट आहे हे, अशी कमेंट एक चाहत्याने केली आहे. हेमंत सर, खरंच तुमच्या पोस्ट असतात त्या निर्भीड असतात. अभिमान आहे तुमचा की मराठी चित्रपटसृष्टीत तुमच्या सारखा अभिनेता आहे, अशी कमेंट अन्य एका युजरने केला आहे. 

टॅग्स :तेजस्वी यादवबिहारसेलिब्रिटी