Girish Pardeshi : गेल्या काही वर्षात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज डिजिटलायझेशनच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध आहेत, लोकांना खिशात पैसे ठेवावे लागत नाहीत, मोबाईलच्या माध्यमातून कामे करता येतात. मात्र, यासोबतच ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. असाच धक्कादायक प्रकार मराठी अभिनेत्यासोबत घडला आहे. यासंदर्भात एक अभिनेता गिरीश परदेशीने (Girish Pardesi) व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
अभिनेता गिरीश परदेशीने नुकताच एक वाईट अनुभव सांगितला आहे. आपल्या चाहत्यांचीही फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय, "आता थोड्यावेळापूर्वी माझ्या पत्नीच्या म्हणजे (प्रतिक्षाच्या) फोनवर एका बाईने कॉल करून सांगितलं की, 'मी प्रतिक्षाला १३ हजार रुपये तिच्या जीपेने पाठवायला सांगितले...' , त्या बाईने पहिल्यांदा माझ्या पत्नीच्या जिपेवर १० हजार रुपये पाठवले. आणि मग ३ हजार रुपयांच्या ऐवजी ३० हजार रुपये पाठवले. त्यानंतर या दोन्ही व्यवहारांचे स्क्रीन शॉट पत्नीला तिने व्हॉट्सअप केले. शिवाय परत तिला फोन करून सांगितलं की चुकून चष्मा घातला नव्हता म्हणून ३ हजारच्या ऐवजी ३० हजार पाठवले आहेत, स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलंय तर माझा स्कॅनर कोड पाठवते उरलेले २७ हजार तुम्ही माझ्या स्कॅनर कोडवर पाठवा."
पुढे ते म्हणाले, "' मग माझी पत्नी म्हणाली की, अहो, हा व्यवहार जिपेवर झालाय पण खात्यात पैसे जमा झाले नाहीत, मग मी काय करू?' तेव्हा त्या बाईने माझ्या पत्नीला विचारलं की, तुमच्या खात्यात किती बॅलन्स आहे? त्यावर उत्तर देत माझ्या बायकोने तिला सांगितलं की, हे मी तुम्हाला का सांगू? असं म्हटल्यानंतर लगेचच त्या बाईने फोन कट केला...याचा अर्थ तो फोन फ्रॉड होता. मी त्या नंबरवर कॉल केला तेव्हा तो फोन सतत एंगेज होता. आम्ही पोलिसांकडून सल्ला घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं की, असे अनेक फ्रॉड केस होत आहेत. असे अनेक नंबर्स त्यांच्याकडे असतात. त्यामुळे ते नंबर तुम्हाला कधी लागणार नाही. इथे तुमच्या जीपेवर दिसेल १० हजार आणि ३० हजार जमा झाले असल्याचं पण ते नीट बघितले तर 'स्प्लिट रिक्वेस्ट' असं येतं. त्याच्यामुळे असं जर झालं तर तुम्ही सतर्क रहा, आणि जर तुम्हाला सांगितलं कोणी की खात्यावर पैसे पाठवायचेत कोड पाठवा तर आधी त्या व्यक्तीशी तुम्ही खात्री करून घ्या!" असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.