Join us

या मराठमोळ्या अभिनेत्याने कांदा खाऊन काढले दिवस; आर्थिक परिस्थितीमुळे झाला होता हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 18:08 IST

Deepak shirke:अभिनयाची आवड जोपासत ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. मात्र, ते कोणत्याही भूमिकेत फिट बसत नाहीत असं सांगत त्यांना दूर लोटलं जायचं.

मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी 1980 ते1990 चा काळ गाजवला. या काळात थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती झाली. विशेष म्हणजे या सिनेमात झळकलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या दर्जेदार अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे दिपक शिर्के (deepak shirke).  हम, वंश, तिरंगा, व्हेंटिलेटर,थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज या आणि अशा कितीतरी हिंदी आणि मराठी सिनेमात नायकासह खलनायिकी भूमिका साकरुन दिपक शिर्के यांनी लोकप्रियता मिळवली. परंतु, कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात खूप मोठा स्ट्रगल केला आहे.  एक काळ असा होता जेव्हा त्यांनी केवळ कांदा खाऊन दिवस काढले आहेत.

गिरगावमधील चिरा बाजार येथे दिपक शिर्के लहानाचे मोठे झाले. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत त्यांचं बालपण मजेत गेलं. मात्र, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर भावनिक दु:खासह आर्थिक दु:खाचाही डोंगर कोसळला. घरची परिस्थिती सावरण्यासाठी दिपक यांच्या खांद्यांवर जबाबदारी आली. घरातील मोठा मुलगा या नात्याने त्यांनी कमी वयात कष्ट करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला दिपक यांनी वाल सोलून देण्याचं काम सुरु केलं. त्यातून जे पैसे मिळायचे त्यातून ते पाव विकत घ्यायचे. आणि, या पावासोबत ते कांदा खायचे. जवळपास दीड वर्ष ते अशाच पद्धतीने जीवन जगत होते. त्यानंतर पुढे त्यांची आई शाळेत नोकरी करु लागली. परंतु, दिपक यांनी त्यांचं काम थांबवलं नव्हतं. त्यांनी घरगुती व्यवसाय सुरु केला. शिक्षणात फारसा रस नसणाऱ्या दिपक यांना नाटक, अभिनयाची आवड होती. ही आवड त्यांनी या काळातही जपली.

दरम्यान, अभिनयाची आवड जोपासत ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. मात्र, ते कोणत्याही भूमिकेत फिट बसत नाहीत असं सांगत त्यांना दूर लोटलं जायचं. मात्र, टूरटूर नाटकादरम्यान त्यांची ओळख लक्ष्मीकांत बेर्डे सोबत  झाली आणि लक्ष्मीकांत यांचा हात धरुन त्यांचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झालं. एक शून्य शून्य या मालिकेमुळे दिपक शिर्के लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी आक्रोश या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमालक्ष्मीकांत बेर्डे