Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांना हसवण्याचं काम माझ्या नशिबाला...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, असं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:54 IST

कुशल बद्रिके हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असं नाव आहे.

Kushal Badrike: कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असं नाव आहे. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर अभिनेत्याने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला कुशलने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, कुशल बद्रिके हा त्याच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओमुळे चर्चेत येतो. अनेकदा त्याने शेअर केलेल्या पोस्ट चर्चेचा विषय बनतात. नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या मजेशीर पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "मिशी.... पहिली प्रेयसी, पहिली नोकरी, पहिलं घर जसं विसरता येत नाही तसंच पहिल्यांदा काढलेली मिशी सुद्धा विसरता येत नाही. मी पहिल्यांदा मिशी काढली तेव्हां इयत्ता १०वी मध्ये होतो, जवळ जवळ आठवडा भर आरसा सुद्धा अनोळखी माणसा सारखा बघायचा माझ्या कडे. शाळेत, क्लास मध्ये रुमाल धरून कितीतरी दिवस फिरलो होतो मी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शहीद भगतसिंग ह्यांच्या थोर कामासोबत त्यांच्या मिश्या सुद्धा मला तेवढ्याच लक्षात राहिल्या.“मुछे हो तो नथ्थूलाल जैसी” हे बालपणी ऐकलेलं वाक्य पुढे आयुष्यभर का लक्षात राहिलं कुणाचं ठाऊक."

पुढे त्याने लिहिलंय की, "नंतर नशिबात जे काम आलं त्यात बहुतेकदा दाढी मिशी काढावीच लागली. “चार्ली चॅप्लिनची” मिशी कधी माझ्या ओठांवर चिकटली नाही पण त्याचं लोकांना हसवण्याचं काम मात्र माझ्या नशिबाला अगदी घट्ट चिकटलं.फक्त एका गोष्टीचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही की मिशीला कोणतीही चव नसताना, काही लोक दातांना “उसाचं गुऱ्हाळ” करून त्या मिश्या “उसा” सारख्या चावत का बसतात?" कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेमराठी अभिनेतासोशल मीडिया