मराठी कलाविश्वातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे भरत जाधव.नाटक, मालिका, सिनेमा या सगळेकडे दांडगा वावर असलेल्या भरत जाधव यांनी आजपर्यंत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा रंगत असते. आपल्या मनमिळाऊ, हसऱ्या स्वभावामुळे प्रेक्षकांना आपलंसं करणारे भरत जाधव यावेळी प्रचंड संतापले असून त्यांनी यापुढे रत्नागिरीत नाटकाचे प्रयोग करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर भरत जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रत्नागिरीत नाटकाचे प्रयोग न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. अलिकडेच भरत जाधवने रत्नागिरीमध्ये तू तू मी मी या नाटकाचा प्रयोग केला. मात्र, यावेळी नाट्यगृहामध्ये झालेल्या गैरसोयीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाट्यगृहात एसी आणि साऊंड सिस्टीम योग्य नसल्यामुळे त्यांना शो करताना अनेक अडचणी आस्या. त्यामुळे पुन्हा रत्नागिरीत शो करणार नाही असं सांगितलं.
“AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा. तुम्ही प्रेक्षक एवढं शांत कसं काय राहू शकता. यापुढे मी रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, ” असं म्हणत भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भरत जाधव यांचं 'तू तू मी मी' हे नाटक सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. अलिकडेच कोल्हापुरात या नाटकाचा प्रयोग झाला. विशेष म्हणजे या प्रयोगानंतर त्यांनी मुंबई सोडून थेट कोल्हापुरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे सगळेच आवाक झाले. मात्र, “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झालं आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. पण, आपल्याकडे पैसे हवेत आणि आरोग्यही त्यामुळे मी कोल्हापुरात राहण्याचा निर्णय घेतला.