Join us

"देवाशी केलेली तुलना ऐकू आली की..." आस्ताद काळेची मार्मिक पोस्ट! कुणावर साधला निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:09 IST

आस्तादनं एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. 

छोट्या पडद्यासह मोठा पडदा आणि रंगभूमी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आस्ताद हा सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय असतो. अनेक सामाजिक घटनांवर तो मोकळेपणाने बोलताना दिसतो. आताही आस्तादनं एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.  त्याची हो पोस्ट प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.

आस्तादनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एका रोमन सम्राटाची गोष्ट सांगितली आहे. त्याने लिहलं, "मार्कस ऑरेलियस नावाचा एक अतिशय देदीप्यमान कारकीर्द असलेला रोमन सम्राट होता. त्याची प्रजा त्याच्यावर, त्याच्या कारभारावर खूष होती. त्याला देवासमान मानत होती. तो कधी बाहेर पडला, तो आसपासच्या भागात येतोय असं कळलं, की प्रजा उत्स्फूर्तपणे त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळायची. प्रचंड कौतुक करायची"

"मार्कस ऑरेलियस याने त्याच्या लवाजाम्यात एक माणूस पगारावर ठेवला होता. त्या माणसाचं एकच काम होतं. कायम सम्राटाबरोबर राहायचं, आणि अशी स्तुती, असा जयघोष, अशी देवाशी केलेली तुलना ऐकू आली, की सम्राटाच्या कानात एकच गोष्ट सांगत राहायची... तू फक्त एक मर्त्य मानव आहेस..... तू फक्त एक मर्त्य मानव आहेस.... आणि आज... या ठिकाणी..... आपल्या देशात....।", असं म्हणत आस्तादनं गोष्ट संपवली. पण, त्याने ही पोस्ट नेमकी कुणासाठी केली, हे स्पष्ट केलेलं नाही. कारण, त्यानं कुणाचही नाव घेतलं नाही. पण, स्वत:चा उदोउदो करणारे राजकारणी असो किंंवा फिल्म इंडस्ट्रीतील इतर कोणी, त्यांना या पोस्टमधून आस्तादनं चिमटा काढल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

 

आस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी आस्तादच्या या क्रिप्टिक पोस्टवर हसण्याचे इमोजी कमेंट केले आहेत. आस्ताद काळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर  सध्या त्याच्या 'मास्टर माईंड' नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. आजवरच्या कारकिर्दीत आस्तादने अनेक मालिकांमध्ये काम केलं. मात्र, 'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. आस्ताद काळे नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो.

टॅग्स :अस्ताद काळेमराठी अभिनेताराजकारण