Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 10:49 IST

काही दिवसांपूर्वीच 'मुरांबा' मालिकेतून जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने एक्झिट घेतली होती. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराने 'मुरांबा' मालिका सोडली आहे.

'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील रमा आणि अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'मुरांबा' मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. काही दिवसांपूर्वीच 'मुरांबा' मालिकेतून जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने एक्झिट घेतली होती. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराने 'मुरांबा' मालिका सोडली आहे. याबाबत अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच 'मुरांबा' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री झाली होती. रेवाचा नवरा असलेल्या अथर्व या पात्राने मालिकेला रंजक वळण आणलं होतं. 'मुरांबा' मालिकेत अभिनेता आशय कुलकर्णी अथर्व हे पात्र साकारत होता. पण, आता त्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशयने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. आशयने 'मुरांबा' मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "थँक्यू स्टार प्रवाह आणि मुरांबा टीम...हा प्रवास खूप छान होता. जाता जाता जुने मित्र पुन्हा नव्याने भेटले. काही नवीन मित्र जुनेच मित्र आहेत असं वाटलं. प्रेक्षकहो तुमचं प्रेम असंच राहो", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

आशय हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला.  'माझा होशील ना' या मालिकेतही तो झळकला होता. 'इंदोरी इश्क' या हिंदी मालिकेतही त्याने काम केलं आहे. 'एक थी बेगम' या वेब सीरिजमध्येही आशय महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'व्हिक्टोरिया' सिनेमातही त्याने मुख्य भूमिका साकारली होती. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारस्टार प्रवाह