Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानधन वाढवण्याची मागणी केली म्हणून झाला छळ, 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:27 IST

अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेत 'वच्छी' या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री संजीवनी पाटील (Sanjeevani Patil). तिची वच्छी ही भूमिका तुफान गाजली. प्रेक्षकांना हे कॅरेक्टर खूप आवडलं. दुसऱ्या भागावेळी तिला सर्वोत्कृष्ट खलनायिका म्हणून पुरस्कारही मिळाला होता. मात्र आता अभिनेत्री संजिवनी पाटीलने धक्कादायक खुलासा केला आहे. मानधन वाढवून द्या अशी मागणी केल्याने चक्क तिला सेटवर त्रास देण्यात आला. इतकंच नाही तर नंतर तुला कोण काम देतं ते बघतो अशी धमकीही देण्यात आली. संजिवनी पाटीलने घडलेला सर्व प्रकार नुकताच सांगितला आहे.

'लोकमत फिल्मी'च्या अनटोल्ड स्टोरीमध्ये अभिनेत्री संजिवनी पाटील म्हणाली, "मला मालिकेच्या पहिल्या दोन भागात तेव्हा दिवसाला अडीच हजार, तीन हजार मिळायचे. मी तिसऱ्या भागाच्या वेळी मानधन वाढवून मागितलं. मी जय जय स्वामी समर्थ मालिकेत दिवसाला साडेचार हजार घ्यायचे. मग रात्रीस खेळ चाले च्या तिसऱ्या भागाची ऑफर आली आणि मी ती मालिका सोडली. पण तिसऱ्या भागात वच्छी ही गाजलेली भूमिका करायला मी अडीच हजारात काम का करेन. सुरुवातीला केलं पण नंतर जेव्हा मी मानधन वाढवायला सांगितलं तेव्हा त्यांनी ऐकलं नाही. मी मध्येच मालिका सोडली आणि घरीच बसले. मला दिग्दर्शक थेट घरी भेटायला आले. आमची पुन्ह मानधनावरुन बोलणी झाली. मी इनव्हॉइसवर साडेचार हजार केल्यावरच पुन्हा सेटवर गेले."

ती पुढे म्हणाली, "पण नंतर सेटवर मला खूप त्रास दिला गेला. कारण त्यांचा माझ्यावर राग होता. वच्छी ही भूमिका जिला दुसऱ्या भागात काम करताना अवॉर्ड मिळालं होतं ती भूमिका कधी मरेल का? माझे सीन कमी झाले. एकाबरोबर वाद झाला ना मग त्याच्या आजूबाजूचे  सगळे लोक तुम्हाला त्रास देतात. एका संध्याकाळी सेटवर वच्छीच्या अंगावर सगळी भूतावळं येणार आणि ती मरणार असं मला सांगण्यात आलं. माझ्या भूमिकेचा शेवट होणार हे पाहून मला खूप वाईट वाटलं. माझी भूमिका मेली नाही तर मारली. ठिके, पण म्हणून माझा प्रवास संपत नाही. मी शून्यातून प्रवास केला आहे. जे लोक शून्यातून प्रवास सुरु करतात त्यांना हरण्याची भिती वाटत नाही. मी तो सीन खूप चांगला केला. शेवटच्या सीनपर्यंत मला टॉर्चर केलं. यापुढे तुला कोण काम देतंय ते मी बघतो अशीही धमकी मला देण्यात आली. तुम्ही माझी भूमिका मारुन काही होत नाही माझी रंगदेवता बघतेय आणि तीच मला मारेल."

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकाररात्रीस खेळ चाले ३