Join us

मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 11:58 IST

६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या अर्जुन-मलायकाने ब्रेकअप केल्याचं वृत्त होतं. यावर आता मलायकाच्या मॅनेजरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल असलेले मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अर्जुन आणि मलायकाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परस्पर संमतीने मलायका आणि अर्जुन एकमेकांपासून वेगळे झाल्याचं बोललं जात होतं. ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या अर्जुन-मलायकाने ब्रेकअप केल्याचं वृत्त होतं. यावर आता मलायकाच्या मॅनेजरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, अनेक सूत्रांच्या माहितीप्रमाणे मलायका अर्जुन वेगळे झाले आहेत. "मलायका आणि अर्जुन यांच्यात सुंदर नातं होतं. यापुढेही दोघांच्या मनात एकमेकांबद्दल स्थान असेल. पण आता त्यांनी  वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि एकमेकांच्या आदरार्थ त्यांनी याबाबत मौन पाळलं आहे. त्यांनी कोणालाही यात ओढून नातं तोडण्याची संधी दिली नाही. त्यांच्यात दीर्घ, प्रेमळ आणि फ्रुटफूल नातं होतं जे आता दुर्देवाने राहिलं नाही. पण याचा अर्थ त्यांच्यात एकमेकांविषयी राग आहे असा होत नाही. दोघंही एकमेकांचा आदर करतात आणि एकमेकांसाठी कायम ठामपणे उभे राहतील. गेल्या काही वर्षांपासून दोघांनी या नात्यात आदर राखला. यापुढेही राखतील. त्यांच्यात अतिशय सीरियस नातं होतं त्यामुळे आता या हळव्या क्षणी लोकांनी त्यांना स्पेस द्यावी अशी त्यांची इच्छा आहे", असं सांगण्यात आलं होतं. पण, मलायका-अर्जुन वेगळे झालेले नसल्याचं अभिनेत्रीच्या मॅनेजरकडून सांगण्यात आलं आहे. 

मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चांनंतर अभिनेत्रीच्या मॅनेजरने इंडिया टुडेशी संवाद साधला. "नाही, या सगळ्या अफवा आहेत", असं मलायकाच्या मॅनेजरकडून सांगण्यात आलं आहे. पण, याबाबत अद्याप मलायका किंवा अर्जुनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच त्यांच्यात बिनसलं आहे का? याबाबत चाहते संभ्रमात आहेत. 

2018 पासून अर्जुन आणि मलायकाच्या लव्हस्टोरीची चर्चा होती. तेव्हा पहिल्यांदा दोघांनी एकत्र इव्हेंटला हजेरी लावली होती. नंतर मलायकाच्या 45व्या वाढदिवशी त्यांनी एकत्र फोटो पोस्ट करत नातं जाहीर केलं होतं.  मालदीव्ह्जमधील त्यांच्या व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी मलायकाने लेकाच्या पॉडकास्टमध्ये मात्र अर्जुनविषयी काहीही सांगितले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून दोघं एकत्रही दिसले नाहीत. ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायकाने क्रिप्टिक पोस्टही शेअर केली होती. त्यामुळे या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आलं. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरसेलिब्रिटी