'कांतारा' सिनेमा आला आणि प्रचंड गाजला. ऋषभ शेट्टीच्या तगड्या अभिनयाने सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. 'कांतारा'च्या मेकर्सने अर्थात होमबाले फिल्म्सने त्यांच्या आगामी पौराणिक सिनेमाची घोषणा केलीय. 'महावतार नरसिंह' असं या सिनेमाचं नाव असून काही दिवसांपूर्वी सिनेमाचं मोशन पोस्टर भेटीला आलं. 'महावतार नरसिंह' सिनेमात भारतीय मनोरंजन विश्वातील एक सुपरस्टार झळकण्याची शक्यता आहे. कोण आहे तो?
'महावतार नरसिंह'मध्ये कोण झळकणार?
सुरुवातीलाच सांगायला हवं की, 'महावतार नरसिंह' सिनेमा हा एक अॅनिमेशन सिनेमा असून त्याचा 3D मध्येही प्रेक्षकांना अनुभव घेता येईल. या सिनेमात नरसिंहाच्या प्रमुख भूमिकेत सुपरस्टार प्रभास झळकणार असल्याची शक्यता आहे. अर्थात याबद्दल अजून कोणतीही अधिकृत खुलासा झाला नाहीये. प्रभासने याआधीही 'आदिपुरुष' सिनेमात श्रीरामांची भूमिका तर 'कल्की २८९८ एडी' सिनेमात कर्णाची भूमिका साकारली. त्यामुळे प्रभास नरसिंहाच्या पौराणिक भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
या दिवशी रिलीज होणार 'महावतार नरसिंह'
'महावतार नरसिंह' सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल अजून कोणताही खुलासा झाला नाहीय. तरीही २०२५ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. या सिनेमात प्रभासच्या चेहऱ्याचा अॅनिमेशन रुपात वापर करण्यात येईल आणि त्याचा आवाजही आपल्याला ऐकायला मिळेल अशी चर्चा आहे. अशाप्रकारे 'कांतारा'नंतर होमबाले फिल्सम्स पुन्हा एकदा विष्णुच्या नरसिंह अवताराची पौराणिक कथा दाखवणार आहे.