परेश मोकाशी (Paresh Mokashi) आणि मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी. या दोघांनी मिळून एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'नाच गं घुमा', 'वाळवी' ते आता 'मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी' या सिनेमांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या काही सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आज परेश मोकाशी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त मधुगंधाने सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी आज ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मधुगंधाने खास पोस्ट शेअर करत लिहिले, "खोटा वाटावा इतका चांगला माणूस. सरस्वतीदेवीचा वरदहस्त घेवूनच आज जगात अवतीर्ण झालेला हा मनुष्य , साधा, सरळ , मितभाषी , कुणाची निंदा, नाही कुणा वर टीका नाही , आपलं वाचन, लेखन , महाभारताचा अभ्यास यात रमणारा, कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही...आपल्या विश्वात मश्गूल, अबोलपणा मुळे शिष्ट वाटणारा व्यवहारा पासून दूर राहणारा, जगात रमणारा तरीही गारगोटी सारखा कोरडा असणारा, संतत्व अंगी बाळगून असला तरी जमिनीशी सदैव जोडलेला. प्रतिभावंत आणि अभ्यासू असा माझा मित्र, गुरू, सहलेखक , दिग्दर्शक नवरा...परेश जन्म दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा . खूप खूप प्रेम.."
मधुगंधाच्या पोस्टवर सर्वांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मधुगंधा आणि परेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मधुगंधा उत्तम लेखिकाही आहे. ती अनेक मालिकांचं लिखाण करते. शिवाय निर्मातीही आहे. परेश आणि मधुगंधाची जोडी मराठी सिनेसृष्टीत सध्या धुमाकूळ घालत आहे.