Join us

कुणाल कामराने मागितली माफी! म्हणाला, त्रास झाला, तुम्ही मला मेल करा, देशात हवे तिथे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 20:27 IST

Kunal Kamra apologized: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ क्लबमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेना काढून घेतली, यावरून स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामराने 'ठाणे कि रिक्षा' हे विडंबन गीत म्हटले होते. शिंदे यांना गद्दार म्हटल्याने कामरा राजकीय वादात सापडला आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून हजर राहण्याच्या नोटीसा दिल्या जात आहेत. कामराच्या या शोला जे प्रेक्षक हजर राहिले होते, त्यांनाही याचा त्रास झाला आहे. यावर कामराने या प्रेक्षकांची माफी मागितली आहे. तसेच एका प्रेक्षकाला ऑफरही दिली आहे. 

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ क्लबमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावेळी अनेक प्रेक्षकही उपस्थित होते. या प्रेक्षकांची पोलीस चौकशी करणार असून त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत.

माझ्या शोमध्ये आल्यानंतर तुम्हाला झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल मी माफी मागतो. कृपया मला मेल करावा. मी तुमच्यासाठी एका व्हेकेशनची योजना तयार करेन. तुम्हाला देशात आवडेल त्या ठिकाणी, अशी पोस्ट कुणाल कामराने केली आहे. कुणालच्या त्या शोच्या प्रेक्षकांमध्ये मुंबईचा एक बँकरही होता. तो काही दिवसांपूर्वी तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर गेला होता. पोलिसांच्या नोटीसनंतर त्याला दौरा सोडून मुंबईत परतावे लागले होते. कामराने या बँकरची माफी मागितली आहे. 

कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी तीन समन्स बजावले आहेत. कामरा हजर न झाल्याने सोमवारी खार पोलीस मुंबईतील येथील कुणाल कामरा याच्या घरी दाखल झाले होते. यावेळी तिथे त्याचे आई वडील उपस्थित असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी कुणाल कामराच्या आई वडिलांकडे त्याच्या बाबत प्राथमिक चौकशी केली. कामराने इन्स्टाग्राम पोस्टमधून मुंबई पोलिसांवर भाष्य केलं. “अशा पत्त्यावर जाणे जिथे मी गेल्या १० वर्षांपासून राहत नाही तो तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे, असे म्हटले होते. 

टॅग्स :कुणाल कामराएकनाथ शिंदेशिवसेना