'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेली मालिका आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर असून नुकतीच या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत क्षिती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून ती महिपतची मुलगी साक्षीची केस लढवणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्षिती टेलिव्हिजनवर दिसणार आहे.
क्षितीने 'ठरलं तर मग' मालिकेतील भूमिकेविषयी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. ही भूमिका का स्वीकारली? याबाबतही तिने तिने सांगितलं. 'राजश्री मराठी'शी बोलताना क्षिती म्हणाली, "माझी आई दररोज 'ठरलं तर मग' ही मालिका बघते. त्यामुळे मालिकेत काय चाललंय हे मला माहीत होतं. मग मला सुचित्रा मॅम आणि सोहमचा फोन आला की अशी भूमिका आहे तर तू करशील का?".
"इतकं छान आणि मस्त कॅरेक्टर आहे. व्हाइट, ब्लॅक किंवा ग्रे नाही असं मस्त कॅरेक्टर आहे. मी जशी आहे तसं थोडंसं हे कॅरेक्टर आहे. पटकन समोरच्याला बोलणारी, ती आणि तिचं काम अशी थोडीशी ही भूमिका आहे. त्यामुळे हे थोडंसं मला इंटरेस्टिंग वाटलं. शिवाय मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासोबत मी खूप पूर्वी एक मालिका केली होती. मालिकेची सगळी टीम छान आहे. आणि मालिका नंबर १ आहे...तर मग अशा शोचा भाग होणं कोणाला नाही आवडणार?", असंही पुढे क्षिती म्हणाली.
'ठरलं तर मग' मालिकेत अभिनेत्री क्षिती जोग वकील दामिनी देशमुख या भूमिकेत दिसणार आहे. मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरते. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियंका तेंडोलकर, ज्योती चांदरकर, चैतन्य देशपांडे, सागर तळशिकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.