Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जत्रा'मध्ये दिसली असती 'मुरांबा' फेम अभिनेत्री, नंतर क्रांती रेडकरला मिळाली भूमिका; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:25 IST

क्रांतीनेच सांगितला किस्सा, 'त्या' अभिनेत्रीने दिलेला सिनेमाला नकार, कारण...

२००५ साली आलेला 'जत्रा'हा मराठीतला कल्ट सिनेमा आहे. केदार शिंदेंचा हा सिनेमा कल्ट क्लासिक ठरला. आजही हा सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येकवेळी लोकांना हसवतो. भरत जाधव, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, कुशल बद्रिके असे अनेक कलाकार या सिनेमात होते. 'ह्यालागाड त्यालागाड' ही गावांची नावंही लोकांनी भलतीच आवडली होती. नुकतंच 'जत्रा'च्या टीमने लोकमत फिल्मीसोबत बोलताना सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी क्रांती रेडकरच्या जागी एका दुसऱ्याच अभिनेत्रीला सिनेमाची ऑफर होती असा खुलासा झाला. 

'लोकमत फिल्मी'च्या 'लाईट्स, कॅमेरा, रियुनियन' या कार्यक्रमात भरत जाधव, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे, सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे २० वर्षांनी एकत्र आले. यावेळी क्रांती रेडकरने तिच्या भूमिकेचा किस्सा सांगितला. क्रांती रेडकर म्हणाली, "खरंतर माझी शेवंता ही भूमिका आधी अदिती सारंगधरला ऑफर झाली होती. कारण तेव्हा वादळवाट मालिका हिट झाली होती. तिची लूक टेस्टही झाली होती. पण अदितीला अक्काचा रोल करायचा होता. तेव्हा केदार शिंदे तिला म्हणाले की अक्काच्या भूमिकेसाठी तू लहान वाटतेस. तू शेवंताच कर. पण ते तिला मान्य नव्हतं आणि तिने सिनेमाला नकार दिला."

त्या काळात मी हिंदी-इंग्रजी थिएटर करत होते. कारण मला जग फिरायचं होतं. माझी आणखी एक चांगली मैत्रीण भारती आचरेकरसोबत मी  'फनी थिंग कॉल्ड लव्ह' हे नाटक करत होते. तेव्हा भारती केदारच्या एका मालिकेतही काम करत होती.  शेवंताच्या भूमिकेत कोणाला घ्यायचं हा केदारला प्रश्नच पडला होता. तेव्हा भारतीनेच केदारला सांगितलं की अरे आपल्या वेड्या मुलीला विचार क्रांती आहे ना. केदारला वाटलेलं हिला कसं विचारायचं? पण ते इतकं साधं होतं. त्याने मला फोन केला, 'क्रांती, सिनेमा करतोय'. मी म्हणाले, 'ओके ओके, कधी?' तो म्हणाला, 'ये तू उद्या दादरला आपण भेटतोय'. सिनेमा काय, कोण आहे, स्क्रिप्ट काय हे मला काहीही माहित नव्हतं. पण मला ते ग्रामीण वगैरे भूमिका इंटरेस्टिंग वाटली. नंतर सेटवर सर्वांनी उच्चारांवरुन माझी खूप खेचली होती."

अदिती सारंगधर सध्या 'मुरांबा' मालिकेत इरावतीची भूमिका साकारत आहे. ती यामध्ये खलनायिका आहे. 'वादळवाट' मालिकेमुळे अदिती घराघरात पोहोचली होती. नंतर संसार, लेकाचा जन्म झाल्यानंतर अदितीने ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा अभिनयात सक्रीय झाली आहे. 

टॅग्स :क्रांती रेडकरकेदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट