गेल्या काही दिवसांपासून 'चिकी चिकी बुबूम बूम' (Chiki Chiki Booboom Boom Movie)हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील तगडी स्टारकास्ट पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे कलाकार सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान एका मुलाखतीत प्रसाद खांडेकर(Prasad Khandekar)ने शूटिंगच्या सेटवर प्राजक्ता माळी (Prajakta Mali) रडल्याचा एक किस्सा सांगितला.
चिकी चिकी बुबूम बूम चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीने रावी या तरुणीची भूमिका साकारली आहे. रावी अतिशय चुलबुली आणि उत्साही मुलगी आहे पण ती गोंधळलेली सुद्धा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद खांडेकरने शूटिंग सेटवरील किस्सा सांगताना प्राजक्ता माळी भावुक झाल्याचा किस्सा सांगितला. खरेतर प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्राचे आणि सिनेमाचं शूटिंग असं दोन्ही शेड्युल सांभाळून काम करत होती. त्यासाठी तिला वेळेचे नियोजन करावे लागत होती.
अन् प्राजक्ताला कोसळलं रडू
एकेदिवशी ती सिनेमाच्या सेटवर २ वाजता ऐवजी ४ वाजता पोहचली. हास्यजत्रेच्या शूटमुळे ती वेळेवर पोहचू शकली नाही. पण सेटवर पोहचल्यावर ती लगेच म्हणाली की, मी तयार आहे फक्त हेअर आणि कॉश्च्युम सेट करायचा आहे. १० मिनिटांत पूर्ण तयार होईन. त्या दिवशी सेटवर सीनची तयारी आधीच सुरू होती आणि संपूर्ण टीम प्राजक्ताचीच वाट पाहत होती. त्यामुळे प्रसाद खांडेकरने तिला मस्करीत म्हटलं की, वाह! खूप दमल्याचा अभिनय करतेस. हे ऐकल्यावर प्राजक्ता भावुक झाली आणि तिला रडू कोसळलं. त्यानंतर ती म्हणाली की, दादा मी इतक्या धावपळीने वेळेवर पोहचण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही असं म्हणताय? प्राजक्ताचे हे बोलणं ऐकल्यावर प्रसाद खांडेकरला समजलं की आपल्या बोलण्यामुळे तिला वाईट वाटलंय. त्याने लगेच तिची माफी मागितली आणि स्पष्ट केले की, त्याने हे गंमतीत म्हटलं होतं. तिला दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता.
'चिकी चिकी बुबूम बुम' स्टारकास्टया सिनेमात प्राजक्ता माळीसोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद खांडेकर,रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे हे कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.