Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजकारणीच कलाकार झालेत' अवधूत गुप्तेच्या शोवर नेटकरी भडकले, नवं नावच सुचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 09:07 IST

'खुपते तिथे गुप्ते' शोवर नेटकऱ्यांची नाराजी

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा सुरु झाला. हटके नाव आणि कन्सेप्टमुळे हा शो ओळखला जातो. गोपीनाथ मुंडेंपासून ते विक्रम गोखलेंपर्यंत अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींनी या शोवर हजेरी लावली आहे. इतरांबद्दल खुपणाऱ्या गोष्टी या शोवर मोकळेपणाने बोलता येतात. तसंच ज्यांना काही सांगायचं राहून गेलंय ते सुद्धा या निमित्ताने टेलिव्हिजनवर सांगण्यात येतं. यंदाच्या खुपते तिथे गुप्तेमध्ये केवळ राजकारणी मंडळीच हजेरी लावत असल्याने नेटकरी जाम भडकलेत.

10 वर्षांनंतर 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. अवधूत गुप्तेच्या खुपणाऱ्या प्रश्नांवर पाहुणे काय उत्तरं देतात हे बघायला मजा येते. यंदा शोमध्ये हे प्रश्न फक्त खुपणार नाही तर टोचणार आहेत. कारण या पर्वाचं खास आकर्षण खुर्ची आहे. खुर्चीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. आता खुर्चीची चढाओढ तर राजकारण्यांमध्येच असणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून यंदाच्या  पर्वाची सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रोमोही आधीच रिलीज झालाय. तर नुकतंच नारायण राणे यांनी शोमध्ये हजेरी लावली. आता संजय राऊत यांचा प्रोमो रिलीज झाला. म्हणजे यावेळी शोवर केवळ राजकारणीच असणार आहेत का हे बघून प्रेक्षकांचा हिरमोड झालाय. श्रेयस तळपदे सोडून शोमध्ये अद्याप एकही कलाकार आलेला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

शोचं नाव बदला 

'खुपते तिथे गुप्ते'च्या आगामी एपिसोडमध्ये संजय राऊत हजेरी लावणार आहेत. त्याचा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. 'मराठी कलाकार संपलेत, राजकारणी लोकंच आता कलाकार झालेत....अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा', '2024 बहुतेक झी मराठी निवडून येतेय.....' अशा खोचक कमेंट नेटकऱ्यांनी केल्यात. तर एकाने शोचं नाव बदलून 'खुपते तिथे राजकारणी' असं नाव ठेवा असा सल्ला दिलाय.

टॅग्स :झी मराठीअवधुत गुप्ते ट्रोलसोशल मीडियाराजकारण