Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:27 IST

नाटक, सिनेमा, मालिका- केदार शिंदेंनी सांगितला तीनही माध्यमातला फरक

मराठी रंगभूमीवरील सर्वात गाजलेल्या नाटकांपैकी एक म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav) अभिनीत 'सही रे सही' (Sahi Re Sahi). गेल्या २३ वर्षांपासून भरत जाधव अविरत या नाटकाचे प्रयोग करत आहे. विशेष म्हणजे आजही प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत नाटकाचे ४ हजारपेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. २००२ सालापासून हे नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदेंनी नुकतंच नाटक कधी बंद होणार यावर भाष्य केलं. 

नाटक, मालिका की सिनेमा?

केदार शिंदेंनी नाटक, टीव्ही, आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये सर्वात आवडतं माध्यम कोणतं यावर ते म्हणाले, "नाटक हे माझं आवडतं माध्यम आहे. ती जिवंत कला आहे. पण नाटक हे नटाचं माध्यम आहे. सही रे सही मी लिहिलं आणि बसवलं. मग ते भरतने परफॉर्म केलं. शेवटी स्टेजवर भरत दिसतो. भरत हा शिस्तप्रिय नट आहे. त्यामुळे ते नाटक २३ वर्ष आजतागायत सुरु आहे. मी २ तास २० मिनिटांचं नाटक बसवलं होतं ते आजही तसंच सुरु आहे. भरत न कंटाळता ते करत आहे. सही रे सही कधी बंद होणार असं मला कोणीतरी विचारलं होतं. ज्या दिवशी भरत जाधव म्हणेल की आता मला जमत नाहीए. त्या दिवशी नाटक बंद होईल. कारण त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. नाटक बसवेपर्यंत ते मला माझं माध्यम वाटतं. एकदा पडदा उघडला की ते नटाचं माध्यम झालं." युट्यूबर नील सालेकरला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, "मालिका हे लेखकाचं माध्यम आहे. ती गोष्ट अगदीच २० मिनिटात सादर करावी लागते. तिथे दिग्दर्शक असतोच पण लेखक खूप महत्वाचा आहे कारण त्याने ती गोष्ट मांडली आहे. तर सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. सिनेमाच्या सुरुवातीपासून ते सिनेमा लागेपर्यंत ते पूर्णत: माझ्या ताब्यात आहे. माझ्या मनाप्रमाणेच ती लोकांसमोर दिसणार आहे. या सगळ्यात आवडतं माध्यम नाटक वाटतं. कारण प्रयोग करायला मिळतात. तालमीत कलाकारांकडून काम करुन घेता येतं. मी २ महिने सकाळी १० ते रात्री १० तालीम घेतो. शेवटच्या दिवशी मी फॅमिली डॉक्टरला बोलवून त्यांना गोळ्या, इंजेक्शन देतो. कारण ते उभेच राहू शकत नाहीत. मी त्याबाबतीत खूप कडक आहे." 

वर्कफ्रंट

केदार शिंदे यांचे 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत' यांसारखे काही नाटक गाजले आहेत. तर 'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा', 'महाराष्ट्र शाहीर', 'बाईपण भारी देवा', 'यंदा कर्तव्य आहे', 'यांचा काही नेम नाही' सह अनेक सिनेमे लोकप्रिय झाले आहेत. तसंच 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलंय बिघडलंय' या मालिकाही गाजल्या आहेत. आता त्यांचा 'झापुक झुपूक' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत आहे.

टॅग्स :केदार शिंदेभरत जाधवनाटक