Kedar Shinde: सध्या मराठी मनोरंजनविश्वात झापुक झुपूक या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 'बिग बॉस' मराठी फेम सूरज चव्हाणने मुख्य भूमिका साकारली आहे. 'झापुक झुपूक' ला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अलिकडेच केदार शिंदेंनी सिनेप्रेमींसाठी हा चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार आहे, अशी घोषणा केली. त्यानंतर थिएटरमध्ये चाहते गर्दी करत आहेत. मात्र, या चित्रपटामुळे काही नेटकऱ्यांनी सूरज चव्हाणला ट्रोल केलं. याबद्दल पोस्ट लिहून केदार शिंदेंनी ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.
केदार शिंदेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सूरज चव्हाणसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसह कॅप्शन देत त्यांनी लिहिलंय, "एक गोष्ट लक्षात आली आहे. गावखेड्यातील पोरांना ठरवून शहरात प्रवेश बंदी आहे. ठरवून पोराला टार्गेट केलंय, मलाही यात घेरलंय. पण एक ज्याने चोच दिली तोच अन्न देणार, कोंबड झाकलं तरी उजाडण्याचं थांबणार नाही. पण, ही सुरुवात आहे लोकांनो! हा वणवा पेटलाय...." असं म्हणत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापुक झुपुक चित्रपटामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे.
या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज आहे. जसे हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी जे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" सिनेमा २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे.