Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरंच श्रीलीलाला डेट करतोय? कार्तिक आर्यननं सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:21 IST

कार्तिक आर्यनने डेटिंगच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी कार्तिकचा 'भूल भुलैया 3' सुपरहिट ठरला होता. कार्तिक आर्यन ज्या नवीन अभिनेत्रींबरोबर काम करतो, त्यांच्याशी त्याचं नाव जोडलं जातं. सध्या तो अनुराग बसूच्या आगामी अनटाइटल म्युझिकल रोमँटिक चित्रपटामुळे चर्चेत आहे, या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री श्रीलीला ही झळकणार आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चाही खूप सुरू होत्या. अखेर कार्तिक आर्यनने डेटिंगच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक आर्यनने सांगितलं की तो सिंगल आहे.

गेल्या काही वर्षांत कार्तिकचं नाव त्याच्या अनेक सहकलाकारांशी जोडलं गेलं आहे, मग ते जान्हवी कपूर असो किंवा सारा अली खान. आता तो श्रीलीलासोबतच रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. कार्तिकने अलीकडेच फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्याला रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आलं.यावर कार्तिक म्हणाला, "मी सध्या सिंगल आहे आणि डेटिंग करत नाहीये. पूर्वी माझ्या डेटिंग लाईफबद्दल खूप चर्चा झाल्या. त्यातील काही खऱ्या होत्या, काही खोट्या होत्या. चर्चांकडे मी फारसे लक्ष दिले नाही.  एकाच फोटोवरून मीडिया कथा रचतात.  जरी मी नुकतंच एखाद्याला भेटलो असलो तरीही डेटिंगच्या चर्चा सुरू होतात. अशा परिस्थितींना तोंड देताना मला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं आता माझ्या लक्षात आलं आहे".

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या डेटिंगच्या अफवा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. दोघांपैकी कोणीही दावे नाकारले नव्हते किंवा स्वीकारलेही नव्हते. कार्तिकची बहीण कृतिका तिवारीच्या वैद्यकीय पदवी पूर्ण झाल्याबद्दल एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीत श्रीलीला सहभागी झाली होती. पार्टीतील काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा आणखी वाढल्या होत्या. 

फक्त पार्टीच नाही तर अभिनेत्याच्या आईनेच कार्तिकच्या डेटिंगबाबत हिंट दिली होती. जयपूर येथे आयोजित आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान कार्तिकची आई माला तिवारी यांनी होणारी सून कशी असावी याबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या, "कुटुंबाची मागणी आहे की होणारी सून चांगली डॉक्टर हवी'. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. कारण, श्रीलीला हिनं एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे कार्तिकच्या आईचा रोख श्रीलीलाकडेच तर नाही अशी चर्चा सुरु झाली होती. 

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटी