Join us

 अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ला करणी सेनेचा विरोध; वाचा, काय आहे नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 10:37 IST

Prithviraj : ‘पद्मावत’ सिनेमावेळी संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काय झाले, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा करणी सेनेने दिलाय. 

ठळक मुद्देअक्षय कुमारने 2019 साली त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा केली होती.

करणी सेना (Karni Sena) गतकाळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरलेली आपण पाहिली आहे,  पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे, ‘पृथ्वीराज’(Prithviraj). अक्षय कुमारच्या  (Akshay Kumar) या आगामी सिनेमाच्या नावाला करणी सेनेने विरोध दर्शवत हे टायटल बदलण्याची मागणी केली आहे.

करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाचे टायटल बदलण्याची मागणी केलीय.  पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मग सिनेमाचे नाव ‘पृथ्वीराज’ कसे? सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह  यांनी म्हटले आहे. 

इतकेच नाही करणी सेनेने या चित्रपटासाठी आणखीही एक अट ठेवली आहे. अक्षयचा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी अटही त्यांनी ठेवली आहे. मेकर्सनी आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल. ‘पद्मावत’ सिनेमावेळी संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काय झाले, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिलाय. दरम्यान यशराज फिल्म्सने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.अक्षय कुमारने 2019 साली त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा केली होती. ‘वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्या एतिहासिक सिनेमाची घोषणा करताना गर्व वाटतोय. हा सिनेमा माझ्या आतापर्यंतच्या मोठ्या सिनेमांपैकी सर्वात मोठा सिनेमा आहे. पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे,’ असे त्याने घोषणा करताना म्हटले होते.‘पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर झळकणार आहे. मानुषीचा हा डेब्यू सिनेमा आहे.  या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयुक्ता यांची भूमिका साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा सिनेमा आदित्य चोप्राची निर्मिती आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारकरणी सेना