बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत हिच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगना गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याच्या सुनावणीसाठी मंगळवारी कोर्टात अनुपस्थित राहिली. ती संसदेत अधिवेशनासाठी उपस्थित असल्याने कोर्टात येऊ शकली नाही, अशी माहिती तिचं प्रतिनिधित्व करणारे वकील रिझवान सिद्धिकी यांनी सांगितले.
मात्र कंगनाच्या वकिलांनी केलेल्या या दाव्यानंतर जावेद अख्तर यांच्यावतीने उपस्थित असलेले वकील जय के. भारद्वाज यांनी कंगना राणौत ही सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने तिच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्याची मागणी करत अर्ज दाखल केला. भारद्वाज म्हणाले की, कंगना राणौत ही अनेक प्रमुख तारखांना अनुपस्थित राहिली आहे. या तारखांना तिने उपस्थित राहणं आवश्यक होतं. मात्र तिने असं केलं नाही.
दरम्यान, दंडाधिकारी आशिष अवारी यांनी कंगनाचे वकील सिद्धिकी यांना भारद्वाज यांनी दाखल केलेल्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर सिद्धिकी यांनी कंगनाविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यास विरोध केला आहे. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी कंगना राणौत हिला, एक शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.