Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतने आगामी चित्रपटाची केली घोषणा, साकारणार काश्मीरची राणी दिद्दाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 16:40 IST

कंगना राणौतने नुकतेच थलाइवी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यानंतर आता लवकरच ती 'मणिकर्णिका रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. 'मणिकर्णिका'मध्ये झांसीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर 'मणिकर्णिका रिटर्न्स'मध्ये काश्मीरच्या राणी दिद्दाची कथा रेखाटण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगना राणौतने म्हटलं की, 'झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगणांच्या कथेचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी 'मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.' 

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंगना राणौतने मागील आठवड्यात कमल जैन यांच्याशी बोलून चित्रपटाच्या पटकथेवर शिक्कामोर्तब केला होता.

कंगना राणौतने नुकतेच थलाइवी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात ती जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर ती धाकड चित्रपटात दिसणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती धाकड चित्रपटासाठी फिजिकली तयार होताना दिसत होती.

धाकडमधील कंगनाचा लूक आधीच रिलीज करण्यात आला आहे. यात ती दमदार अंदाजात दिसली आहे. धाकडसाठी कंगना खूप उत्साही आहे.

टॅग्स :कंगना राणौतथलायवी