'जोधा अकबर' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. हा सिनेमा चांगलाच गाजला. सिनेमातील हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या केमिस्ट्रीचंही खूप कौतुक झालं. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हा भव्यदिव्य सिनेमा आजही नावाजला जातो. 'जोधा अकबर' सिनेमात हृतिक रोशनने अकबराची भूमिका साकारली होती. त्यावेळी सिनेमाच्या सुरुवातीला एका दृश्यात हृतिकला पिसाळलेल्या हत्तीणीला शांत करायचं होतं. त्यावेळी हृतिकने काय केलं वाचा.
हृतिकने अशी केली तयारी
'जोधा अकबर' सिनेमात हृतिक रोशनचा पिसाळलेल्या हत्तीणीला शांत करणारा हा सीन चांगलाच गाजला. अशा सीनवेळी बॉलिवूड सिनेमांमध्ये बॉडी डबलचा वापर करण्यात येतो. परंतु हत्तीणीशी लढण्याचा हा सीन हृतिकने स्वतः केला होता. 'जोधा अकबर' सिनेमाचे अॅक्शन दिग्दर्शक रवी दिवान यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. हा सीन शूट करण्याआधी एक महिना हत्तीणीला सेटवर आणण्यात आलं होतं.
हृतिक रोशन शूटमधून फ्री झाल्यावर हत्तीणीशी मैत्री व्हावी या उद्देशाने तिला केळं खायला घालायचा. त्यामुळे सीन शूट करण्याआधी काही दिवस हृतिकची हत्तीणीशी चांगली मैत्री झाली. त्यामुळेच जेव्हा सीन शूट करण्याची वेळ आली तेव्हा हृतिकला काहीही अडचण आली नाही. हा सीन काळजाचा ठोका चुकवणार होता. २००८ साली आलेल्या 'जोधा अकबर' सिनेमात हृतिकसोबत ऐश्वर्या राय बच्चन, सोनू सूद या लोकप्रिय कलाकारांनी भूमिका साकारली होती.