Join us

"अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे", जया बच्चन पुन्हा संतापल्या; नेमकं काय घडलं? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 19:34 IST

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या परखड मत आणि कडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. परवानगी न घेता त्यांचे फोटो क्लिक करणंही त्यांना पसंत नाही.

नवी दिल्ली-बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या परखड मत आणि कडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. परवानगी न घेता त्यांचे फोटो क्लिक करणंही त्यांना पसंत नाही. याबाबत त्यांना अनेदका आपण परखडपणे बोलताना पाहिलं आहे. सेलिब्रिटी म्हटलं की कॅमेरामन फोटो टिपतात पण याच गोष्टीवर जया बच्चन अनेकदा नाराज झाल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा एका अनोळखी व्यक्तीनं फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यानं जया बच्चन चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. 

जया बच्चन अमिताभ यांच्यासोबत इंदौरमध्ये होत्या. विमानतळावर एकानं त्यांचा फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. जया आणि अमिताभ यांचा फोटो व व्हिडिओ टिपण्याचा प्रयत्न करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात जया बच्चन एका अनोळखी व्यक्तीला फोटो टिपण्यास विरोध करताना दिसतात. जया बच्चन यांचं फुलगुच्छ देऊन स्वागत केलं जात होतं. त्याचवेळी एक व्यक्ती त्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला जया बच्चन यांनी चांगलंच सुनावलं. 

"प्लीज माझा फोटो काढू नका", असं जया बच्चन दोन वेळा म्हणाल्या. तरी संबंधित व्यक्ती थांबला नाही. त्यावर जया बच्चन आणखी वैतागल्या आणि तुला इंग्रजी कळत नाही का? असं पुन्हा एकदा विचारणा केली. व्हिडिओ टिपणाऱ्या संबंधित व्यक्तीला एक जण बाजूला सारतो आणि व्हिडिओ टिपण्यास मनाई करतो. इतक्यात जया बच्चन यांनी पुन्हा संतापल्या आणि अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे, असं म्हटलं. 

जया बच्चन यांचा हा व्हिडिओ पाहता पाहता सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. आपल्या चाहत्यांवर असा राग काढणं योग्य नाही असं काहींचं म्हणणं आहे. तर व्हिडिओ कमेंट्समध्ये यूझर्सनं ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.   

टॅग्स :जया बच्चन