Gharoghari Matichya Chuli: स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ही जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारतेय. ही मालिकी दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होते. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांचं लाडकं झालं आहेत. प्रत्येक पात्र त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतं. त्यांच्या मनात जागा करते. आता या मालिकेत नवीन वळण येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेच प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले, त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे. ढोल ताश्यांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत. आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू हे हे खास पाहुणे मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय. तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे. जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत असली तरी या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिव्हाळ्याचं नातं आहे. खूप वर्षांनंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद होतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर अखेर जानकी आणि ऋषिकेश घरी परतल्यानंतर ऐश्वर्या आणि सांरग यांची प्रतिक्रिया काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.