२०२३ साली आलेल्या रजनीकांत यांचा 'जेलर' सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट झालाच शिवाय रजनीकांत यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. काही महिन्यांपूर्वी 'जेलर २' विषयी चर्चा होती. अखेर काल संक्रांतीच्या मुहुर्तावर 'जेलर २'चा प्रोमो रिलीज झाला. ४ मिनिटांच्या या प्रोमोत रजनीकांत यांचा स्वॅग आणि त्यांचा अॅक्शन अवतार पाहायला मिळतोय. काय आहे या प्रोमोत? जाणून घ्या.
रजनीकांत यांच्या 'जेलर २'चा प्रोमो
प्रोमोत दिसतं की, 'जेलर'चे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध नवीन स्क्रीप्टची चर्चा करताना दिसतात. अचानक त्यांच्या घरी गोळीबार आणि तोडफोड होते. त्यानंतर समोर रजनीकांत यांची एन्ट्री होते. रजनीकांत यांच्या डोळ्यात आग आणि हातात बंदूक दिसते. शेवटी रजनीकांत घराबाहेर येतात. त्यांच्यासमोर भिंत फोडून दोन गाड्या येतात. रजनीकांत चष्मा काढतात तोच ग्रेनेडचा हमला त्या गाड्यांवर होतो. त्यानंतर रजनीकांत यांचा चेहरा दिसतो. ४ मिनिटांच्या प्रोमोमध्ये रजनीकांत यांची छाप पाडते.
कधी रिलीज होणार 'जेलर २'?
'जेलर २'मध्ये रजनीकांत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत जॅकी श्रॉफ आणि साउथ सुपरस्टार मोहनलाल झळकणार आहे. 'जेलर २'ची रिलीज डेट जाहीर झाली नसून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याचवर्षी २०२५ ला 'जेलर २' रिलीज होईल. रजनीकांत यांच्या 'जेलर २'चा प्रोमो इतका धमाकेदार आहे त्यामुळे सिनेमा लय भारीच असणार यात शंका नाही.