Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला सख्खी बहीण नाही, पण...", नितीश चव्हाणनं सांगितलं 'लाखात एक आमचा दादा'मधील भूमिकेबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:16 IST

Nitish Chavan : भावा- बहिणींच्या नात्यांवर आधारित 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाणने सूर्यादादाची भूमिका साकारत आहे.

झी मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. त्यात आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. ही मालिका म्हणजे 'लाखात एक आमचा दादा'. भावा- बहिणींच्या नात्यांवर आधारित 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण(Nitish Chavan)ने सूर्यादादाची भूमिका साकारत आहे. 

नितीशने मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, "लाखात एक आमचा दादा मालिकेसाठी मला वज्र प्रोडक्शन मधून खांबे सरांचा फोन आला होता त्यांनी मला सांगितले की एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची गोष्ट आहे. गोष्ट थोडी  ऐकली आणि मला हा विषय नवीन वाटला मग मी खांबे सरांना परत कॉल केला आमचं अधिक बोलणं झालं आणि मी ठरवलं की ह्या मालिकेचा भाग बनायचं. माझी पहिली मालिका देखील झी मराठी आणि वज्र प्रोडक्शन सोबत होती आणि आता पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फिरतायेत. जेव्हा आपण आपल्या माणसांमध्ये येतो तेव्हा एका सुरक्षित वातावरणात आल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची ऊर्जा अधिक वाढते. 

सूर्यादादाच्या या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर , मला सख्खी बहीण नाही पण सूर्यादादा सारखंच माझ्या घरात उदाहरण आहे. जस सूर्याला चार बहिणी आहेत तसंच माझ्या मामाला ही चार बहिणी आहे. त्यातली दोन नंबरची बहीण म्हणजे माझी आई त्यांचं नातं मी लहानपणापासून बघत आलो आहे. मामा कसा बहिणींची काळजी घेतो आणि त्याच्या बहिणी त्याच्यावर किती प्रेम करतात ह्या गोष्टी मी 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सूर्याच्या भूमिकेसाठी आत्मसात केल्या आहेत. मालिकेत सूर्याच्या खांदयावर ४ बहिणींची जबाबदारी आहे, खऱ्या आयुष्यात मी कोणाचा दादा नाही पण मला एक दादा आहे त्याचे नाव आहे निलेश दादा. प्रेक्षकांचा खूपच उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला मेसेजेस आले आहेत की खूप वाट पाहत होतो तुझी आणि ह्या आनंदात भर म्हणजे झी मराठीवर परत येत आहेस. सूर्यादादाच्या लुकची ही चर्चा होत आहे. लोकांना आवडतोय सूर्याचा लूक. खूप भारी वाटतंय मला प्रतिसाद पाहून, असे तो म्हणाला. 'लाखात एक आमचा दादा' ८ जुलैपासून रात्री ८.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :नितीश चव्हाणझी मराठी