हॉलिवूडचे प्रसिद्ध गायक जॉन मायकल 'ओझी ऑस्बोर्न' (Ozzy Osbourne) यांचं निधन झालं आहे. ते ७६ वर्षांचे होते. ब्रिटीश हेवी मेटल बँड ब्लॅक सब्बाथचे ते मुख्य गायक होते. तसंच संगीतकारही होते. याच बँडमुळे त्यांना 'प्रिंस ऑफ डार्कनेस' ही ओळख मिळाली. त्यांच्या निधनाने हॉलिवूड आणि संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. २०१९ साली त्यांना पार्किंसन रोगाचं निदान झालं होतं. मात्र आता त्यांचं निधन कशामुळे झालं याचं कारण समोर आलेलं नाही.
टीएमझेड रिपोर्टनुसार, ओझी ऑस्बोर्न काही वर्षांपासून पार्किंसन आजारामुळे त्रस्त होते. काल २२ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओझी यांच्या कुटुंबाने अधिकृत स्टेटमेंट जारी करत सांगितले, "हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की आपले प्रिय ओझी ऑस्बोर्न आता आपल्यात नाहीत. सकाळीच त्यांचं निधन झालं. त्यांच्याजवळ त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांना शेवटपर्यंत कुटुंबाचं प्रेम मिळालं. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्यावी अशी विनंती."
ओझी ऑस्बॉर्न यांच्या निधनाने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहही हळहळला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांचा फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
ओझी ऑस्बोर्न यांनी दोन आठवड्यांपूर्वीच रॉक बँड ब्लॅक सब्बाथच्या शेवटच्या संगीत समारोहावेळी परफॉर्म केले होते. या सोहळ्याचं नाव 'बॅक टू द बिगिनिंग' असं होतं. ही कॉन्सर्ट बँडचे होमग्राऊंड बर्किंघममध्ये ठेवण्यात आलं होतं. ओझी यांचं जाणं संगीत जगतासाठी मोठं नुकसान आहे.