Join us
Daily Top 2Weekly Top 5

या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन, याच आठवड्यात झाला होता त्यांचा चित्रपट प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:26 IST

या अभिनेत्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.

ठळक मुद्देरॉबर्ट यांच्या जॅकी ब्राऊन या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. या चित्रपटात त्यांनी मॅक्स चेरी नावाची भूमिका साकारली होती. ते नुकतेच एल कॅमिनोः अ ब्रेकिंग बॅड मुव्ही या चित्रपटात इडीच्या भूमिकेत दिसले होते.

हॉलिवूडचे अभिनेते रॉबर्ट फॉर्सटर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांना मेंदूचा कॅन्सर असल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. रॉबर्ट यांनी त्यांच्या करियरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांत काम केले असून त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या चित्रपटांना ऑस्कर या प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळ्यात नामांकन देखील मिळाले आहे. 

 

रॉबर्ट यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. रिफलेक्शन इन अ गोल्डन आय, द स्टॉकिंग मून, जस्टिन, मीडियम कूल, कव्हर मी वेबस, पीसेज ऑफ ड्रीम, द डॉन इज डेड, स्टंटस, हॉलिवूड हॅरी, डिप्लोमेटिक इम्युनिटी, इन बिटविन, कव्हर स्टोरी, कमिटेड, गन्स एंड लिपस्टिक, अंकल सॅम, सुपरनोवा, रेयर विंडो, क्लीनर, द ट्रायल यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी चित्रपटांप्रमाणेच काही प्रसिद्ध शोमध्ये देखील काम केले आहे.

 

रॉबर्ट यांच्या जॅकी ब्राऊन या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. या चित्रपटात त्यांनी मॅक्स चेरी नावाची भूमिका साकारली होती. ते नुकतेच एल कॅमिनोः अ ब्रेकिंग बॅड मुव्ही या चित्रपटात इडीच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट नुकताच अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे. 

 

रॉबर्ट यांच्या निधनाचा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल मीडियावर सामान्य लोकांप्रमाणे हॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. 

 

टॅग्स :हॉलिवूड