प्रसिद्ध अभिनेता आणि WWE गाजवणारा कुस्तीपटू ड्वेन 'द रॉक' जॉन्सन त्याच्या प्रचंड आणि पिळदार शरीरासाठी ओळखला जातो. मात्र रॉकने जबरदस्त वजन घटवल्याने जगभरातील नेटकऱ्यांचं आणि त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आगामी 'द स्मॅशिंग मशीन' या सिनेमासाठी रॉकने त्याचं वजन घटवलं आहे. त्याचा आगामी सिनेमा हा एक बायोपिक असून रॉकसाठी ही एक गंभीर आणि आव्हानात्मक भूमिका आहे. याच बायोपिकसाठी रॉकने तब्बल ६० पौंड (२७ किलो) वजन कमी केले असून, त्याच्या नवीन लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रॉकने घटवलं वजन, नेटकरी थक्क
महान एमएमए (MMA) फायटर मार्क केरच्या भूमिकेसाठी ड्वेन तयारी करतोय आहे. हा बायोपिक चित्रपट बेनी सफ्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'द रॉक'च्या नेहमीच्या सुपरहिरो आणि ॲक्शन भूमिकांच्या तुलनेत, केरच्या भूमिकेसाठी त्याला एका वेगळ्या प्रकारच्या शरीरयष्टीची गरज होती. त्यामुळेच आहार आणि व्यायामाच्या पद्धतीत बदल करुन ड्वेनने स्वतःच्या शरीरात लाक्षणिक बदल केला आहे. याशिवाय रोज अनेक तास मेकअपमध्ये बसून खऱ्या फायटरसारखं दिसण्यासाठी त्याने प्रोस्थेटिक्सचा वापरही केला. त्यामुळे रॉकचं वजन आता १३६ वरुन १०९ किलो झालं आहे.
जॉन्सनचे नवीन फोटो ऑनलाइन समोर आल्यानंतर, इंटरनेटवर लगेचच प्रतिक्रियांचा पूर आला. चाहत्यांनी आश्चर्य आणि कौतुक करत आता तो किती वेगळा दिसत आहे, याबद्दल कमेंट केल्या. "द रॉक" आता "द पेबल" बनला आहे, रॉक आता माणसात आलाय, अवाढव्य रॉक आता सामान्य माणसासारखा दिसतोय, अशा विनोदी कमेंट्स व्हायरल झाल्या आहेत.
'द स्मॅशिंग मशीन' सिनेमाबद्दल उत्सुकता
'द स्मॅशिंग मशीन' हा सिनेमा मार्क केरच्या संघर्षावर आणि वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांवर आधारीत करतो. व्हेनिस चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाल्यानंतर त्याला खूप प्रशंसा मिळाली असून, जॉन्सनच्या या सिनेमाला 'करिअरला कलाटणी देणारी भूमिका' असं म्हटलं जात आहे. त्यामुळे कुस्तीपटू म्हणून नाव कमावल्यानंतर आता अभिनेता म्हणून ड्वेन जॉन्सन नवी शिखरं गाठणार, यात शंका नाही.