Join us

राजकारण्यांवर मीम्स बनवणं चुकीचं! हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला- "मनमोहन सिंग यांच्यावर बनवलेला मीम..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:56 IST

समाजातील अनेक घटनांवर हेमंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मतं व्यक्त करताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हेमंतने राजकरण्यांवरील मीम्सबाबत भाष्य केलं.

हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अभिनेता असण्याबरोबरच हेमंत दिग्दर्शकही आहे. त्याच्या रोखठोक स्वभावासाठाही तो ओळखला जातो. समाजातील अनेक घटनांवर हेमंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मतं व्यक्त करताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हेमंतने राजकरण्यांवरील मीम्सबाबत भाष्य केलं. 

हेमंतने आरपार ऑनलाईन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. राजकारणातील प्रतिष्ठीत व्यक्तींबाबत मीम्स बनवणाऱ्यांना त्याने स्पष्टच शब्दांत सांगितलं. तो म्हणाला, "महाराष्ट्र हा नेहमीच सुसंस्कृत समाज म्हणून आपल्या पुढे आला पाहिजे. आजकालची मुलं कोणाचं कसंही मीम्म बनवतील. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही मीम्स बघायला मिळतात. तर मला असं होतं की तो आपला मुख्यमंत्री आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही हिणवू शकत नाही. हे एक संविधानिक पद आहे". 

"मनमोहन सिंग यांच्याबद्दल तुम्ही मीम्स नाही बनवले पाहिजेत. मला अजूनही आठवतं सिंघमचं असं काही तरी त्यांचं मीम आलं होतं. आणि ते खूप हिणवणारं होतं. त्या माणसाने काय पॉलिसी आणल्या, आर्थिक क्रांती केली, हे व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियाच्या जगात सगळं हरवून गेलं. त्याविषयी तुम्हाला काहीही ज्ञान नाही. पण, तुम्ही त्या मीमला लाइक करता आणि फॉरवर्ड करता. त्या व्यक्तीच्या मागचं काम तुम्ही बघतच नाही. मी सर्वपक्षीय लोकांबद्दल बोलतोय. त्यांचा काही ना काही सहभाग आहे. कुठेतरी त्या लोकांनी एक चांगली पॉलिसी आणली असेल ज्यामुळे तिथल्या लोकांना त्याचा फायदा झाला असेल", असंही तो पुढे म्हणाला. 

दरम्यान, हेमंत ढोमे फसक्लास दाभाडे हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, मिताली मयेकर, निवेदिता सराफ, हरिश दुधाडे हे कलाकार आहेत. २४ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.  

टॅग्स :Hemant Dhome Today Newsमराठी अभिनेतादेवेंद्र फडणवीसडॉ. मनमोहन सिंग