Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिकला कंटाळून हेमा मालिनींची 'मेट्रो' सफर; प्रवाशांसोबत सेल्फी तर बाळासोबत मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:32 IST

हेमामालिनी जेव्हा लेडीज डब्यात चढल्या तेव्हा महिलांना धक्काच बसला

मुंबई आणि ट्रॅफिक हे एक समीकरणच आहे. एका जागेवरुन दुसऱ्या ठिकाणी जायला किमान अर्धा तर जास्तीत जास्त दोन तास लागतात. अशा वेळी लोकल ट्रेन किंवा मेट्रोचा प्रवास सुखकारक असतो. स्वस्तात आणि कमी वेळेत आपण नियोजित स्थळी पोहोचतो. याच ट्रॅफिकचा कंटाळा सेलिब्रिटींनाही येतो. आता हेच बघा ड्रीमगर्ल हेमामालिनी यांनी देखील ट्रॅफिक नको म्हणत चक्क मेट्रोने प्रवास केला. याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेमामालिनी यांनी मुंबई मेट्रो आणि त्यानंतर रिक्षानेही प्रवास केला. सर्वसामान्यांसारखा पब्लिक ट्रान्सपोर्टमधून  प्रवास करण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही. हा प्रवास त्यांनी चांगलाच एंजॉय केल्यांचं दिसतंय. हेमा मालिनी यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. जेव्हा त्या लेडीज डब्यात चढतात तेव्हा सर्व महिला प्रवासी बघतच राहतात. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नाही की या अभिनेत्री हेममालिनी आहेत. नंतर बघता बघता त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिला रांग लावतात. एका प्रवासी महिलेच्या बाळासोबतही मस्ती करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या फोटोंना कॅप्शन देत त्यांनी लिहिले, 'सर्वांसोबत एक मस्त अनुभव शेअर करत आहे. कारमधून दहिसरला जायला २ तास लागले. खूपच थकवणारा प्रवास होता. म्हणून संध्याकाळी परत येताना मी मेट्रोने यायचं ठरवलं, आणि ओह माय गॉड! काय मजा आली. आपण मेट्रोचं काम सुरु असताना खूप सहन केलं पण त्याचं आता चीज झालं आहे. स्वच्छ, वेगवान असा हा प्रवास आणि अर्ध्या तासात मी जुहूला पोहोचले.'

त्या पुढे म्हणाल्या,'मेट्रोचा अनुभव घेतल्यानंतर डी एन नगर ते जुहू मी रिक्षाने प्रवास केला आणि तो सुद्धा भन्नाट अनुभव होता. मी रिक्षातून घरी पोहोचताच सुरक्षारक्षकांना विश्वासच बसला नाही. एकंदर मस्तच अनुभव होता.'

हेमा मालिनी यांना मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरताना पाहताच अनेकांना विश्वासच बसत नव्हता. महिला प्रवाशांसाठी तर मेट्रोतलं हे छान सरप्राईजच होतं. ड्रीम गर्ल आजही या वयात तितक्याच सुंदर आणि फिट दिसतात हे नागरिकांनीही जवळून बघितलं.

टॅग्स :हेमा मालिनीमेट्रोसार्वजनिक वाहतूकमुंबई