बॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल' आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) वादात सापडल्या आहेत. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. अलिकडेच हेमा मालिनी या पुरी जगन्नाथ मंदिरात (Jagannath Temple, Puri) दर्शनासाठी पोहचल्या होत्या. हेमा मालिनी यांचा मंदिरातील प्रवेश 'बेकायदेशीर' आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
स्थानिक संघटना श्री जगन्नाथ सेनेने हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सिंहद्वार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत हेमा मालिनी यांनी धार्मिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मुस्लिम पद्धतीने अभिनेता धर्मेंद्रशी लग्न केल्यानंतर मंदिरात त्यांच्या उपस्थितीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा संघटनेने केला आहे.
तक्रारदाराने म्हटले आहे की, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न २१ ऑगस्ट १९७९ रोजी मुंबईतील मौलाना काझी अब्दुल्ला फैजाबादी यांनी लावले होते. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौरशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना ४ मुले आहेत. १९५५ च्या हिंदू कायदा कायद्यानुसार, कोणत्याही हिंदूला दोनदा लग्न करण्याची परवानगी नाही, म्हणून धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. धर्मेंद्र यांनी त्यांचे नाव बदलून दिलावर खान केवल कृष्णा असे ठेवले आणि तमिळ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या हेमा मालिनी यांनी त्यांचे नाव बदलून आयेशा बीवी आर. चक्रवर्ती असे ठेवले. या लग्नापासून या जोडप्याला ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.
हेमा मालिनी यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये ११ फिल्मफेयर अवॉर्ड जिंकले आहेत. १९६८ मध्ये 'सपनों का सौदागर' या चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या हेमा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा २०२० मध्ये 'शिमला मिर्ची' मध्ये दिसल्या होत्या. या सिनेमात रकुलप्रीत आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होते. २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ७७ वर्षीय हेमा यांनी अलिकडेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला गेल्या होत्या आणि संगमात स्नान केलं होतं.