Join us

'थर्ड आय'मध्ये नवीन सिनेमे असल्याचा आनंद - रमेश सिप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 21:42 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना 'एशियन कल्चर पुरस्कार'; सुभाष देसाई यांना 'सत्यजीत रे मेमोरियल पुरस्कार'

मुंबई - थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जुने सिनेमे दाखवले जातील अशी अपेक्षा होती, पण इथे नवीन सिनेमेही दाखवले जात असल्याचे पाहून आनंद झाल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी म्हणाले. २०व्या थर्ड आय फेस्टिव्हलमध्ये एशियन कल्चर पुरस्कारा'ने गौरविण्यात आल्यानंतर ते बोलत होते.

२०व्या थर्ड आय फेस्टिव्हलला मुंबईतील माहीममधील सिटीलाईट सिनेमागृहात सुरुवात करण्यात आली. महोत्सवयाच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना 'एशियन कल्चर पुरस्कारा'ने, तर फिल्म सोसायटीचा प्रचार करणारे सुभाष देसाई यांना 'सत्यजीत रे मेमोरियल पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, महोत्सवाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप मांजरेकर, महोत्सवाचे संचालक संतोष पाठारे, फिल्म सोसायटी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष देसाई, एशियन फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त चैतन्य शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

सत्यजीत रे मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची भावना सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. सुधीर नांदगावकर यांच्या पश्चात प्रथमच थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल होत असल्याचे सांगत  नांदगावकर यांच्या नावे प्रकाश मगदूम यांना पुरस्कार देण्यात आल्याचे किरण शांताराम म्हणाले. त्यांनी महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यावेळी ढाकणे म्हणाले की, आपल्याला काळासोबत बदलण्याची गरज आहे. फिल्मसिटीमध्ये आम्ही बदल करत आहोत. अशा प्रकारचे महोत्सव प्रेरणा देण्याचे काम करतात. केवळ सिनेमा पाहून उपयोगाचे नाही, तर त्यातून बरेच काही शिकायचे असते असेही ढाकणे म्हणाले. 

या महोत्सवात ४५ फिल्म एशियन चित्रपट दाखवण्यात येणार असून, यात १५ भारतीय आणि १० मराठी सिनेमाचा समावेश असेल. 'अँड्रॉगॉगी' या इंडोनेशियन भाषेतील सिनेमाने महोत्सवाची सुरुवात झाली. अभिनेत्री स्मिता तांबे, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी ज्युरी म्हणून पाहिले आहे.

टॅग्स :मुंबईबॉलिवूड