Join us  

'हनुमान 2'मध्ये सुपरस्टार राम चरणची एन्ट्री; साकारणार श्रीरामाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:56 AM

 'हनुमान' सिनेमात हनुमंतची भूमिका साऊथ स्टार तेजा सज्जाने साकारली आहे.  

 दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज झाला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.  'हनुमान' सिनेमात हनुमंतची भूमिका साऊथ स्टार तेजा सज्जाने साकारली आहे.  या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची  बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आता या सिनेमाचा दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'हनुमान' या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर जगभरात भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडला आहे. हनुमानाच्या व्हीएफएक्स आणि कथेने प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्यास भाग पाडले आहे. त्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलच्या बातम्याही वाढल्या आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम देखील सुरू केले आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या कथेपासून ते कास्टिंगपर्यंत सर्व काही फायनल केले जात आहे. हनुमान चित्रपटाच्या पार्ट 2 चे नाव 'जय हनुमान' असणार असल्याचे समोर आले आहे.

प्रशांत वर्मा दिग्दर्शित या सिनेमातील श्रीरामाच्या भूमिकेसाठी निर्माते राम चरणच्या नावाचा विचार करत आहेत. त्यामुळे आगामी 'हनुमान 2' या सिनेमात राम चरण श्रीरामाच्या भूमिकेत दिसेल, असे म्हटलं जात आहे.   तथापि, अद्याप या प्रकरणी निर्मात्यांनी किंवा राम चरणच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. राम चरण याआधी 'RRR' या सुपरहिट चित्रपटात रामाच्या अवतारात दिसला होता. 'हनुमान' हा चित्रपट प्रशांतच्या सिनेमॅटिक विश्वाचा पहिला भाग आहे. या विश्वाच्या अंतर्गत 20 कथांद्वारे दिग्दर्शक 12 सुपरहिरोची ओळख करून देणार आहेत. 

राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच  'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची राम चरणचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. शिवाय रवीना टंडनची लेक राशा थडानीही राम चरणसोबत तेलुगू सिनेमातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. तर सलमान खानच्या  'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. 

टॅग्स :राम चरण तेजासेलिब्रिटीसिनेमाTollywoodराम मंदिर