Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 18:41 IST

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता म्हणून नाट्यपदे गायली जाणार आहेत.

गेल्या वर्षी ४ जून रोजी अष्टपैलू विख्यात नट अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता सन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली. सुभाष सराफ आणि ‘ग्रंथाली’ यांचे त्यास सहकार्य आहे. त्यानुसार शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सन्मानसोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर  पश्चिम, येथे योजला आहे.

विष्णू जाधव, सुरेंद्र दातार, शिवाजी नहरेकर, वसंत अवसरीकर, बाबा पार्सेकर, सीताराम कुंभार, प्रकाश बुद्धिसागर, विद्या पटवर्धन आदी वीसेक कलावंतांचा नाट्यकर्मींचा सन्मान अशोक सराफ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, शामराव विठ्ठल को.ऑप. बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, अल्कॉन एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष अनिल खवटे आणि डॉ. संजय पैठणकर उपस्थित राहतील.‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता म्हणून नाट्यपदे गायली जाणार आहेत. मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे ती सादर करतील. संहिता अरुण जोशी यांची आहे. अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पहिल्या आठ रांगा राखीव आहेत, कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका शिवाजी मंदिर येथे दोन दिवस आधी उपलब्ध असेल, असे ‘ग्रंथाली’च्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप कळवतात.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ