अजय देवगण आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या Raid 2 सिनेमाची गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. Raid 2मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख आमनेसामने दिसणार आहेत. या सिनेमात अजय देवगणने अमेय पटनायक या आयकर विभाग अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे.
रितेश देशमुख Raid 2 सिनेमात दादाभाई ही भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये रितेशचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. ७४ यशस्वी रेड करणारा अमेय पटनायक त्याची ७५वी रेड दादाभाईच्या घरी टाकणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. दादाभाईच्या घरी अमेय पटनायक त्याच्या साथीदारांसह रेड मारायला येतो. पण दादाभाईच्या हुशारीपुढे अमेय ही रेड मारण्यात यशस्वी होणार की नाही, हे पाहणं रंजक असणार आहे.
Raid 2चा ट्रेलर पाहून जिनिलीया देशमुखही थक्क झाली आहे. जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये Raid 2चा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत ती म्हणते, "हे मिस करू शकत नाही. आणि मी ती बायको होणार नाही जी पक्षपात करते, याचं वचन देते. अजय देवगण, वाणी कपूर, रितेश देशमुख आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा".
अजय देवगण आणि रितेश देशमुख या दोघांशिवाय सिनेमात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. १ मे २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. 'रेड'चा पहिला भाग यशस्वी झाला होता. त्यामुळे 'रेड २' ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल.