'देऊळ बंद' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. गश्मीर महाजनीचा हा पहिला सिनेमा. प्रवीण तरडेंनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. महान वैज्ञानिक आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील द्वंद्व या सिनेमात बघायला मिळालं. हा सिनेमा चांगलाच गाजला. गश्मीरचा पहिलाच सिनेमा असूनही त्याच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. अशातच 'देऊळ बंद' सिनेमाच्या वेळेस गश्मीरला आलेला अनुभव त्याने सांगितलाय.
लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर म्हणाला की, "देऊळ बंद सिनेमाचा क्लायमॅक्स आम्ही शूट करत होतो तेव्हा बाबा (रविंद्र महाजनी) त्र्यंबकला होते. आई-बाबा नेहमी म्हणायचे की, मी देवळात जास्त जात नाही. म्हणजे जाणारच नाही असं नाही, पण दर शनिवारी उठून देवळात जायचं असं मी करत नाही. मला आई-बाबा नेहमी म्हणायचे शनिवार तुझा आहे, तो पाळला पाहिजे वगैरे. मी म्हटलं ठीकेय ना. मी देवाला मानतो आणि रोज सकाळची सुरुवात देवाला हात जोडूनच करतो. देवळात दरवेळेस नाही जाणं होत माझं."
गश्मीर पुढे म्हणाला की, "तर देऊळ बंदच्या वेळेस मी बाबांना त्र्यंबकला असताना बोललो होतो की, तुम्ही देवळात जात नाही सारखं म्हणत असता. पण देऊळ बंदच्या निमित्ताने स्वामींनी माझी अख्खी परिक्रमा घडवून आणली. मी त्यानिमित्ताने त्यांच्या सर्व स्थानांवर गेलो. पिठापूर असो, गाणगापूर असो, अक्कलकोट असो किंवा त्र्यंबक असो. सगळ्या स्थानांवर जाऊन तिथल्या गाभाऱ्यात आरती करुन मी पूजा केली." अशाप्रकारे गश्मीरने त्याचा खास अनुभव सांगितला.