अलीकडेच 'पुष्पा २'च्या चेंगराचेंगरीचं प्रकरण ताजं असतानाच राम चरणच्या एका आगामी सिनेमाबद्दल चाहत्याने स्वतःलाच संपवण्याची धमकी दिलीय. राम चरणच्या आगामी 'गेम चेंजर' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमात राम चरणसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाची गाणी अन् राम चरण-कियारा अडवाणीच्या केमिस्ट्रीची सध्या चांगलीच चर्चा दिसून येतेय. अशातच या सिनेमाबद्दल एका चाहत्याने अभिनेत्याला RIP लेटर लिहिलंय.
राम चरणच्या चाहत्याने लिहिलेल्या पत्रात काय?
सोशल मीडियावर राम चरणला चाहत्याने लिहिलेलं RIP पत्र व्हायरल झालंय. या पत्रात लिहिलंय की, "तुम्ही चाहत्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करताय. तुम्ही जर या महिन्याअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने गेम चेंजरच्या टीझरविषयी कोणतीही अपडेट किंवा सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला नाही, तर मला हे सांगण्यात अतिशय दुःख होतंय की, मी माझं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलेन." चाहत्याने लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.
चाहत्याचा राग अनावर
अशाप्रकारे चाहत्याने लिहिलेलं हे RIP लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालंय. 'गेम चेंजर' सिनेमा १० जानेवारीला रिलीज होणार आहे. परंतु या सिनेमाचा ट्रेलर अजूनही रिलीज झाला नाही. RRR नंतर राम चरणचा हा बहुचर्चित सिनेमा असूनही सिनेमाचं प्रमोशन थंड वेगात सुरु आहे. त्यामुळेच चाहत्याने राग प्रकट केला असूुन स्वतःचं आयुष्य संपवण्याची धमकी दिलीय. 'गेम चेंजर' सिनेमात राम चरणसोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहे.