Join us
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना कारने फरफटत नेले; प्रसिद्ध अभिनेत्री कियानाचा अवघ्या ३३ व्या वर्षी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 08:52 IST

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कियानाचा वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. काय घडलं नेमकं?

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येत आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध निकेलोडियन चॅनलची बालकलाकार आणि व्हॉइस आर्टिस्ट कियाना अंडरवुड (Kiana Underwood) हिचा न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अवघ्या ३३ वर्षांच्या कियानाचा 'हिट-अँड-रन' अपघातात झालेला मृत्यू हा सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ब्रुकलिनमधील पिटकिन अव्हेन्यू येथे घडला. कियाना रस्ता ओलांडत असताना एका काळ्या रंगाच्या 'फोर्ड एक्सप्लोरर' SUV गाडीने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कियाना त्या गाडीखाली अडकली आणि चालकाने तिला खूप दूरवर फरफटत नेले. त्यानंतर तिथेच असलेल्या एका दुसऱ्या कारनेही तिला चिरडले. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही गाड्यांचे चालक तिला जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कियानाचा जागीच मृत्यू झाला.

न्यूयॉर्क पोलीस विभाग (NYPD) या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार चालकांचा शोध घेतला जात आहे. कियानाच्या निधनानंतर सोशल मीडियावर तिचे चाहते आणि सहकलाकार दुःख व्यक्त करत आहेत. कियानाच्या वडिलांनीही फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या मुलीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

कियाना अंडरवुडने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. विशेषतः निकेलोडियनच्या 'ऑल दॅट' (All That) या लोकप्रिय कॉमेडी शोच्या शेवटच्या सीझनमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. याशिवाय तिने 'लिटिल बिल' (Little Bill) या प्रसिद्ध मुलांच्या मालिकेत 'फ्युशिया ग्लोव्हर' या पात्राला आपला आवाज दिला होता.  वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी एका कियानासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीचा असा अंत झाल्यामुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Kiana Underwood Dies in Hit-and-Run at 33

Web Summary : Former Nickelodeon star Kiana Underwood, 33, died in a hit-and-run accident in Brooklyn. A car struck her while crossing the street, and the driver fled the scene. Police are investigating, and tributes pour in for the 'All That' actress.
टॅग्स :हॉलिवूडअपघातकार