'फॅमिली मॅन' या वेबसीरिजचे अनेक चाहते. या वेबसीरिजचे दोनही सीझन चांगलेच गाजले. सध्या 'फॅमिली मॅन ३'ची (family man 3) चांगलीच चर्चा असून या वेबसीरिजबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे 'फॅमिली मॅन ३'मधील एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी गरभंगा येथील जंगलात मित्रांसोबत फिरायला गेला असताना 'फॅमिली मॅन ३'फेम अभिनेता रोहित बसफोर (rohit basfore) मृतावस्थेत आढळून आला. रोहितच्या कुटुंबाने त्याची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केलाय. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
'फॅमिली मॅन ३'फेम अभिनेत्याचं निधन
मीडिया रिपोर्टनुसार, रोहित 'फॅमिली मॅन ३'चं शूटिंग संपवून काही महिन्यांपूर्वी त्याच्या गावी परतला होता. रविवारी तो त्याच्या काही मित्रांसोबत गुवाहाटी येथील गरभंगा जंगलात फिरायला गेला होता. दुपारी १२.३० वाजता तो घरातून निघाला. परंतु काही तासांनी रोहितसोबत त्याच्या कुटुंबाचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या मनात काळजी निर्माण झाली. काही तासांनी रोहितच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबाला या दुःखद घटनेविषयी सांगितलं. रोहितला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
रोहितच्या शरीरावर जखमा
रोहितच्या अकस्मात निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी तपास केल्यावर रोहितच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. रोहितचा मृतदेह गुवाहाटीमधील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रोहितची हत्या झाला असल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे. ही घटना घडण्यापूर्वी रोहितचा एका व्यक्तीसोबत पार्किंगवरुन मोठा वाद झाला होता. त्यामुळे तीन लोकांपासून रोहितच्या जीवाला धोका होता. रोहितचा मृत्यू झाल्याने यामागे कुटुंबाने एका जीम मालकाचं नाव घेतलं. याच व्यक्तीने रोहितला पिकनीकसाठी आमंत्रण दिलं होतं. सध्या जीम मालक आणि उर्वरीत तीनही व्यक्ती फरार आहेत.