Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरही मराठी अभिनेत्याने सुरु ठेवला नाटकाचा प्रयोग; प्रेक्षकांनी दिली अशी दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:30 IST

पायाला दुखापत झाल्यामुळे ऐनवेळी नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला असता. मात्र, प्रेक्षकांचं आणि नाट्यकर्मींचं नुकसान होऊ नये यासाठी अभिनेत्याने प्रयोग सुरु ठेवला,

प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्राण ओतून त्यात काम करत असतो. इतकंच नाही तर, बऱ्याचदा हे कलाकार जीवाची बाजीदेखील लावतात. कलाकारांच्या याच मेहनतीमुळे त्यांची एखादी भूमिका, नाटक वा सिनेमा लोकप्रिय होतो. सध्या सोशल मीडियावर अभिनेता शंतनू मोघे याची चर्चा रंगली आहे. पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही शंतूनने रंगमंचावर त्याचं नाटक सादर केलं.शंतनूची पत्नी, अभिनेत्री प्रिया मराठेने याविषयी पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

'संभाजी' मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शंतून मोघे. मालिकांसह,चित्रपटांमध्ये काम केलेल्या शंतनूची पाळमुळं अजूनही रंगमंचाशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे आजही तो नाटकांमध्ये काम करताना दिसून येतो. अलिकडेच शंतनूच्या 'सफरचंद' या नाटकाचा बोरिवलीमध्ये प्रयोग झाला. या नाटकापूर्वी एका महानाट्याची रिहर्सल करताना शंतनूच्या पायाला गंभीर दुखापत झाली. परिणामी, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र, या परिस्थितीतही त्याने सफरचंद नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला.

पायाला दुखापत झाल्यामुळे ऐनवेळी या नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला असता. मात्र, प्रेक्षकांचं आणि नाट्यकर्मींचं नुकसान होऊ नये यासाठी शंतनूने पाय फ्रॅक्चर असतानाही या नाटकाचा प्रयोग केला. विशेष म्हणजे चक्क वॉकर घेऊन तो स्टेजवर वावरला. याविषयी एक पोस्ट शेअर करत प्रियाने शंतनूचं कौतुक केलं आहे.

"Real hero! Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत..हे तूच करू जाणे.. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते.. पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनूनी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हडाचा कलाकार म्हणता येईल, असं प्रियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, प्रियाने या पोस्टसोबत एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कर्टन कॉलच्या वेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने शंतनूचं कौतुक केलं. शंतनूची एन्ट्री झाल्यावर प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. 

टॅग्स :शंतून मोघेप्रिया मराठेनाटकसेलिब्रिटी