काल एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे गायक सोनू निगमवर (sonu nigam) कॉन्सर्टमध्ये झालेली दगडफेक. दिल्लीतील टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये सोनू निगमवर दगडफेक झाल्याची बातमी काल सगळीकडे आली. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने उपस्थित प्रेक्षकांना असं करु नका, म्हणून आवाहनही केले. अशातच या संपूर्ण प्रकरणावर गायक सोनू निगमने मौन सोडलंय. याशिवाय दगडफेक झाली नाही, हेही स्पष्ट केलंय. काय म्हणाला गायक?
सोनू निगमने सोडलं मौन
इन्स्टाग्रामवर कॉन्सर्टचे फोटो पोस्ट करुन सोनू निगमने कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा केला. सोनू निगम लिहितो की, "जसं मीडियाने लिहिलंय तसं DTU मध्ये दगडफेक आणि बॉटल फेकण्याची कोणतीही घटना घडली नाही. मंचावर कोणीतरी वेप फेकली जी शुभंकरच्या छातीला लागली. मला या घटनेविषयी सांगण्यात आलं. त्यामुळे मी शो थांबवला आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की, पुन्हा असं घडलं तर मला शो थांबवावा लागेल." अशाप्रकारे सोनू निगमने दगडफेक झाल्याचं खंडन केलं.
मीडिया रिपोर्टनुसार DTU मध्ये दगडफेक झाल्याने सोनू निगमला चांगलाच त्रास झाला. त्याने उपस्थित प्रेक्षकांना असं करु नका, असं आवाहन केलं. DTU च्या रोहिणी कॅम्पसमधील प्रेक्षकांना सोनू निगमने शेवटी हात जोडून विनंती केली की, "तुमच्यासोबत चांगला वेळ घालवता यावा म्हणून मी इथे आलोय. तुम्ही कॉन्सर्टचा आनंद घेऊ नये, असं मी सांगितलेलं नाही. पण कृपया असं काही करु नका" दगडफेक झाल्याने सोनूच्या टीम मेंबर्समधील काही सदस्य जखमी झाल्याचं समजतंय. पण आता सोनूने दगडफेक झाली नाही, हे स्वतः स्पष्ट केलंय.